पुणे, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचा प्रश्न सुटला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा याच वाड्यात सुरू केली होती.
भिडेवाडा प्रकरणी न्यायालयात एक खटला सुरू होता. हा खटला पुणे महापालिकेने जिंकला. यामुळे लवकरच वाड्यात स्मारक निर्मितीचे काम सुरू करता येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
फुले दाम्पत्यानं एक जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीनं पुढे आली होती. शाळा स्थापनेला १९९८ मध्ये दीडशे वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, नितीन पवार यांनी फुलेवाडा ते भिडेवाडा अशी मिरवणूक काढली होती. त्या वेळेपासून हे स्मारक करावे, या मागणीने जोर धरला होता.
भिडेवाड्यात आता दोन गुंठे जागा राहिली आहे. त्यातील जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात होता. या वाद सुटावा यासाठी राज्य शासनाने महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर हा प्रश्न सुटला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.