नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना २०० ते ३५० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ बुधवार ६ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. हे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. उर्वरीत अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर,अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार पर्यंत सर्वांना अनुदान जमा होईल. दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या या दहा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची दहा हजार पर्यंतची देयके आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे देयक दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.