नवी दिल्ली, ६ सप्टेंबर, २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर असे पाच दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरपासून नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी आहे. हा मुहूर्त साधून संसदेच्या पुढील कामकाजाचा श्रीगणेशा नव्या वास्तूमधून होणार असल्याचे वृत्त आहे.
संसदेचे कामकाज
सप्टेंबर महिन्यात ऐन गणेशोत्सवात संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे. संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर असे पाच दिवस असेल. सतराव्या लोकसभेचे तेरावे सत्र आणि राज्यसभेचे २६१ वे सत्र होणार आहे. विशेष अधिवेशनात अमृत काळाशी संबंधित विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली. विशेष अधिवेशनाचा अजेंडा अर्थात नियोजीत कामकाजाची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे कामकाजाचे स्वरुप कसे असेल यावरून तर्कवितर्क करणे सुरू आहे.
साधारणपणे अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधी सर्व खासदारांना कामकाजाचा अजेंडा कळवला जातो. ही माहिती लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सचिवालयातून पार पाडली जाते. विशेष परिस्थितीत कामकाज सुरू होण्याच्या काही तास आधी खासदारांना कामकाजाचा अजेंडा कळवला जातो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.