कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तूर्तास मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांविरोधात कारवाई करणार नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
राजकीय हेतूनं मुलांच्या अटकेच्या धमक्यांचा दिल्या जात असल्याचा दावा मुश्रीफांच्या बाजूने करण्यात येत आहे. मात्र मुश्रीफांच्या मुलांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलं नाही. चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर राहिले नाहीत. जामीन दिल्यास चौकशीवर परिणाम होईल, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, हा गुन्हा दाखल होताच हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीच्या प्रकरणात गोवण्यासाठी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. तर विवेक कुलकर्णी याने आपल्या विरोधात दाखल केलेला गुन्हा हे एक षड्यंत्र असल्याचे दाखल हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या याचिकेत म्हंटले आहे. तर दुसरीकडे मुश्रिफांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या विवेक कुलकर्णी आणि इतर १६ जणांविरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.