नामांतराविरोधात एमआयएमचं साखळी उपोषण

नामांतराविरोधात एमआयएमचं साखळी उपोषण

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्याच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवत प्रस्ताव मंजूर केला, आणि औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तर, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले. मात्र, एमआयएमचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली असून औरंगाबाद नावाचा बोर्डही लावण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण अधिकच चिघळले आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. नामांतराविरोधात आंदोलन करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “औरंगाबादचे नामांतर फक्त एका राजकीय नेत्याच्या इच्छेसाठी करण्यात आले आहे. तसे असेल तर माझीही इच्छा आहे की, मुंबईचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज महानगर’, पुण्याचे नाव ‘फुले नगरी’ तर नागपूरचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी’ करा. औरंगाबादचे नामकरण का करायचे? मी काही औरंगजेबचा भक्त नाहीय. ते फक्त एक राजा होते.” असं जलील यावेळी म्हणाले.

तर दुसरीकडे मनसेकडून ‘स्वाक्षरी मोहीम’ राबवली जात आहे. त्यात मनसेने इम्तियाज जलील यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे. नामांतराच्या निर्णयाला एमआयएमने विरोध केल्यावर मनसेकडून जलील यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जलील रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असतील, तर आम्ही देखील आंदोलन करुन उत्तर देऊ, असा इशारा मनसेने दिला होता. दरम्यान जलील यांनी उपोषणाची घोषणा करताच मनसेकडून देखील स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version