Uddhav Thackeray: "धमकी देणाऱ्या नार्वेकरांना निलंबित करा " शिवसेना भवनातून उद्धव ठाकरेंची मागणी

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले.
Uddhav Thackeray: "धमकी देणाऱ्या नार्वेकरांना निलंबित करा

मुंबई: महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आज एक ऐतिहासिक चित्र पाहायला मिळाले. मुंबईच्या शिवसेना भवनातून शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांनी आपला 'संयुक्त वचननामा' प्रसिद्ध केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर प्रथमच हा जाहीरनामा जनतेसमोर आला असून, मुंबईकरांना पारदर्शक कारभाराचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, याच वेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर तोफ डागत राज्यातील लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. "राहुल नार्वेकर हे केवळ नावापुरते अध्यक्ष राहिले आहेत. ते सभागृहाबाहेर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून वागत असून उमेदवारांना दमदाटी करत आहेत. अध्यक्षांनी निष्पक्ष राहण्याचा अलिखित दंडक नार्वेकरांनी पायदळी तुडवला आहे. अशा अध्यक्षांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा," अशी आक्रमक मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करताना उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या (RO) फोन रेकॉर्ड्सची मागणी केली. "निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्ड्स का जाहीर केले जात नाहीत? सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे तेही डिलीट केले आहेत का? अशा परिस्थितीत कोर्टात जाऊन तरी काय होणार आणि विश्वास ठेवायचा तरी कोणावर?" अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या. नवीन पिढीतील 'जेन-झी' (Gen Z) मतदारांचा लोकशाहीतील हक्क हिरावून घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: Explosion at Odisha: ओडिशात मृत्यूचे तांडव; बेकायदेशीर दगडखाणीत स्फोट, दोन जणांच्या मृत्यूसह मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही सडकून टीका केली. निवडणूक आयोगाचे कामकाज म्हणजे केवळ एक 'नाटक' असल्याचे सांगत त्यांनी संशय व्यक्त केला की, निकाल काहीही असो, आयोग सत्ताधाऱ्यांच्याच फायद्याचा निकाल देईल. "जर हिंमत असेल तर आयोगाने संशयास्पद जागांवरील निवडणुका रद्द कराव्यात, अन्यथा तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हे सिद्ध होईल," अशा कठोर शब्दांत त्यांनी आयोगाला सुनावले. साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून निवडणुका बिनविरोध करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आज प्रसिद्ध झालेल्या संयुक्त वचननाम्यात मुंबईतील वाढते प्रदूषण, पायाभूत सुविधा, मराठी भाषेचे जतन आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यावर भर देण्यात आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या 'ब्रँड'मुळे सत्ताधारी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, मुंबईच्या गल्लीबोळातील राजकारण आता अधिकच तापले आहे.

मुंबईसह राज्यातील 29  महापालिकांच्या निवडणुकांमध्ये 'मविआ' आणि मनसेची ही छुपी किंवा जाहीर युती भाजप-शिंदे-अजित पवार गटासाठी डोकेदुखी ठरू शकते. लोकशाही संपवून राज्यात झुंडशाही सुरू झाल्याचा जो आरोप ठाकरेंनी केला आहे, त्याला जनतेतून कसा प्रतिसाद मिळतो, हे येत्या 16 जानेवारीला निकालातून स्पष्ट होईल. तूर्तास, शिवसेना भवनातील या पत्रकार परिषदेने निवडणुकीच्या वातावरणात एक वेगळीच रंगत आणली आहे.

हेही वाचा: Uddhav Thacekray and Raj Thackeray Vachannama : ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रकाशित, राज-उद्धव ठाकरे काय म्हणाले?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version