पुणे: राज्याच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि ‘शब्दाचा पक्का’ अशी ओळख असलेले दिवगंत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच बारामतीमध्ये यंदाच्या निवडणुकीत कमालीची शांतता पाहायला मिळाली. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानात संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असताना, बारामतीने मात्र ‘दादां’च्या विरहापोटी जणू मतदानावर मौन व्रत धारण केल्याचे चित्र दिसले.
राज्यात सरासरी 70 टक्के मतदान झाले असून अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, बारामती तालुक्यात केवळ 54.90 टक्के मतदान झाले, जे पुणे जिल्ह्यात सर्वात कमी ठरले. 28 जानेवारी रोजी निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असतानाच झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या धक्क्यातून बारामतीकर अद्याप सावरलेले नसल्याचे स्पष्ट जाणवले. “ज्यांच्यासाठी ही निवडणूक होती, तोच नेता निघून गेला,” अशी भावना अनेक मतदारांच्या मनात होती.
पुणे जिल्ह्याचा विचार करता वेल्हे (राजगड) तालुक्याने 79.30 टक्के मतदानासह अव्वल स्थान पटकावले. मावळ, शिरूर आणि खेड तालुक्यांनीही 75 टक्क्यांहून अधिक मतदान नोंदवत लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग दर्शवला. जिल्ह्याच्या इतर भागांत राजकीय चुरस आणि उत्साह दिसत असताना, बारामतीत मात्र दुःखाचे सावट मतदान केंद्रांवर जाणवत होते.
या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि पवार कुटुंबीयांनी काटेवाडी येथे जाऊन सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार यांची सकाळी लवकर मतदान करण्याची परंपरा त्यांनी जपल्याचे दिसून आले. मात्र, नेत्यांनी मतदान केले असले तरी सर्वसामान्य मतदारांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद दिसून आला.
मतदानानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाद्वारे मतदारांचे आभार मानले. “अजितदादांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेली विकासकामे अधिक सक्षमपणे पुढे नेऊ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दादांच्या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथीस त्यांनी विशेष महत्त्व दिले.
आता सर्वांचे लक्ष 9 फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. बारामतीतील कमी मतदानाचा टक्का निकालावर काय परिणाम करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.