त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन व मंदिराच्या देखभालीसाठी ५ ते १२ जानेवारीपर्यंत मंदिर बंद करण्यात आले होते. या कालावधीत त्रिकाल पूजा, प्रदोष पुष्पपूजा आदी नित्य परिपाठ सुरू होते. मात्र भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. नियोजित वेळेत संबंधित संवर्धन काम पूर्ण झाल्यामुळे आज, शुक्रवार पासून सकाळी ७ वाजेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे.
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात मूर्ती झीज, गर्भगृहातील दुरूस्तीचे काम पुरातत्व विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. या काळात पुरातत्व विभागाकडून शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. तसेच गर्भगृहास चांदीचे दरवाजे बसविण्यात आले. त्याशिवाय मंदिराच्या सभामंडपात असलेला हर्षमहालही दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे. सभामंडपातील दर्शन रांगेसाठी बसविण्यात आलेले लोखंडी कठडे काढून स्टेनलेस स्टीलचे कठडे बसविण्यात आले आहेत. ही सर्व कामे देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी आणि विश्वस्त मंडळाचे नेतृत्व आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत.
हर्षमहाल सिसम आणि सागवानीवर केलेल्या अप्रतिम कलाकुसरीचा नमुना आहे. त्याचेही पुन:सौंदर्यीकरण आणि नुतनीकरण करण्यात आले आहे. तो वर्षातून तीन वेळेस भाविकांना पाहता येतो. आता तो दररोज भाविकांना पाहता येणार असून दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.