उन्हाळा हा फक्त घाम आणि थकवा घेऊन येत नाही, तर तो आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो. प्रखर उन्हात बाहेर पडताच शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागते. अनेकजण याला साधे डिहायड्रेशन समजून दुर्लक्ष करतात, मात्र हीच छोटी चूक पुढे जाऊन किडनी स्टोनसारख्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरू शकते.
तापमान वाढत गेल्यामुळे शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात घाम निर्माण करते. जर या काळात पुरेसे पाणी पिले गेले नाही, तर शरीरात असे बदल होतात ज्यामुळे किडनीमध्ये खडे तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळेच उन्हाळ्यात किडनी स्टोनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात.
शरीरातून घामाद्वारे पाणी बाहेर पडल्यावर त्याची योग्य भरपाई झाली नाही, याचाच परिणाम किडनीला फिल्टर करण्यासाठी पुरेसे द्रव मिळत नाही. परिणामी, लघवीचे प्रमाण कमी होते. अशा स्थितीत कॅल्शियम, ऑक्सालेट आणि युरिक ॲसिड यांसारखे घटक जमा होऊ लागतात आणि हळूहळू खडे तयार होतात.
काही व्यक्तींमध्ये किडनी स्टोनचा धोका अधिक असतो. जे लोक कमी पाणी पितात, ज्यांना यापूर्वी त्रास झाला आहे किंवा कुटुंबात हा आजारआहे, तसेच जास्त मीठ, नॉन-व्हेज प्रोटीन आणि ऑक्सालेटयुक्त पदार्थांचे सेवन करणारे लोक अधिक धोक्यात असतात. याशिवाय लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास असणाऱ्यांमध्येही हा धोका वाढतो.
या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. दररोज किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे, लघवीच्या रंगावर लक्ष ठेवणे, मीठ आणि तळलेले पदार्थ कमी करणे, जास्त प्रोटीन आणि ऑक्सालेटयुक्त अन्न टाळणे हे महत्त्वाचे आहे. यासोबतच लिंबू, संत्र्यासारखी सिट्रेटयुक्त फळे आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.
तसेच तीव्र उष्णतेच्या काळात अवघड व्यायाम टाळणेही गरजेचे आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि सावध जीवनशैली यामुळे किडनी स्टोनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.