विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र एसटी सेवा बंद असल्याचा फटका सर्वसामान्यांसह ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे.
कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावल्यानंतर आता राज्यातील शाळा, महाविद्यालयांचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. मात्र एसटी बससेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा, महाविद्यालयांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे एसटीबस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून एसटी सेवा सुरू करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
कळेयेथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान रस्त्यावर उतरले. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग दर्शवला. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले असून एसटी बससेवा लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बंद असल्याचा जबर फटका बसत आहे. एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठिकाणी खासगी वाहनांचा वापर करत प्रवास करावा लागतो. आणि खासगी वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठी जास्तीचे पैसे घेतात. त्यामुळे प्रवास करण्यासाठी प्रवाशांसह विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.