शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली असून ईडीने संजय राऊतांची अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील राहतं घर जप्त केले आहे. दरम्यान, आज संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे जमा केले होते. पण ते पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटींची रक्कम लाटली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्यांनी लाटली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील पोलीस याप्रकरणाची चौकशी करतीलच मात्र केंद्रीय तपास यंत्रणांनी नि:पक्षपातीपणे तपास करावा, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.