उन्हाळ्यात पचनाशी संबंधित त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. आहारात शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. काकडी, टरबूज यांसारखे पदार्थ जसे उपयुक्त ठरतात, तसेच एक खास सुपरफूड म्हणजे शेवग्याची पानं (Moringa) उन्हाळ्यात अमृतासारखे फायदेशीर ठरते. शेवग्याला ‘चमत्कारी वरदान’ असेही म्हटले जाते, कारण त्याची पाने, शेंगा आणि फुले सर्वच औषधी गुणांनी समृद्ध असतात.
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन A, B, C, कॅरोटीन, आयर्न, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीराला आतून थंडावा मिळतो, पचनसंस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कब्ज, गॅस किंवा ॲसिडिटीसारख्या समस्यांवरही ही पानं उपयुक्त ठरतात.
1. हायड्रेशन आणि पोषणाचा खजिना: उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी होतात. अशावेळी ही शेवग्याची पानं शरीराला आवश्यक पोषण पुरवतात. त्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतात आणि थकवा जाणवू देत नाहीत.
2. उष्माघातापासून संरक्षण: यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून उन्हाळ्यातील संसर्गाचा धोका कमी करतात.
3. पचनसंस्थेसाठी लाभदायक: उन्हाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. शेवग्याच्या पानांमध्ये आणि शेंगांमध्ये असलेले फायबर पोटातील गॅस दूर करण्यास मदत करतात. तसेच पोटातील सूज कमी करून आतड्यांची स्वच्छता राखण्यास सहाय्य करतात.
4. त्वचा आणि केसांची काळजी: तीव्र उन्हामुळे त्वचा कोरडी पडते आणि केसही निस्तेज होतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन A, E आणि ओलेइक ॲसिड त्वचेला हायड्रेट ठेवते आणि सूर्याच्या UV किरणांपासून संरक्षण देते. त्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात.
एकूणच, शेवग्याची पाने हे उन्हाळ्यातील एक प्रभावी आणि नैसर्गिक सुपरफूड असून, ते आहारात समाविष्ट केल्यास शरीर ताजेतवाने आणि निरोगी राहण्यास मदत होते.
(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.