खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र खो-खो मध्ये अव्वल

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र खो-खो मध्ये अव्वल

युवा कर्णधार नरेंद्र कातकडे, आदित्य कुडाळे आणि निखिल यांनी सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी करत सोनेरी यशाची घोडदौड कायम ठेवली. नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा खो-खो संघ पाचव्या सत्रातील खेलो इंडिया मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यासह महाराष्ट्र संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखत सलग पाचव्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र संघाने फायनल मध्ये शुक्रवारी दिल्ली संघाला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने ३८-२८ असा दहा गुणांच्या आघाडीने अंतिम सामना जिंकला. यासह महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ सलग पाचव्यांदा सुवर्णपदक विजेता ठरला. यादरम्यान महाराष्ट्र महिला खो-खो संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत ओडीसा विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ओडिसा संघाने शुक्रवारी महाराष्ट्र महिला खो-खो संघाची खेलो इंडिया युथ गेम्स मधील सुवर्ण यशाची मोहीम रोखली. ओडिसा संघाने अवघ्या तीन गुणांच्या आघाडीने फायनल मध्ये चार वेळच्या सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचा १६-१३ ने पराभव केला. त्यामुळे जानवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ओडिसा संघाने पहिल्यांदा खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे.

किताब जिंकण्याच्या इराद्याने दिल्ली संघाने कुटील डावपेच करत उपांत्य सामना जिंकला. यादरम्यान पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका पश्चिम बंगाल संघाला बसला मात्र याच कुटील डावपेचातून दिल्ली संघाने उपांत्य सामना जिंकत फायनल मध्ये धडक मारली होती. दिल्ली संघाचे हे कुटील राजकारण हाणून पाडण्यासाठी अंतिम सामन्या दरम्यान महाराष्ट्र संघाने स्थानिक कलेक्टर आणि आयुक्तांना खास निमंत्रित केले होते. त्यांच्या उपस्थितीत हा अंतिम सामना रंगला. यादरम्यान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खो-खोच्या खेळातील आपले वर्चस्व सिद्ध करत सामन्यात दणदणीत विजय संपादन केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version