केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. विविध ठिकाणी हिंसक आंदोलन होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी गाड्या, रेल्वे स्थानकांवर जाळपोक करण्यात आली. दरम्यान, अग्निपथ योजनेविरोधात सोमवारी भारत बंदची हाक पुकारण्यात आली. बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाले असून बंदचा जबर फटका नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारला बसला आहे.
अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच पंजाबमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हरियाणामध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झारखंडमधील शाळा बंद राहणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन होत आहेत. यामध्ये सरकारी मालमत्तेची तोडफोड, जाळपोळ आदींचा समावेश आहे. आंदोलकांनी आतापर्यंत अनेक ट्रेन आणि बसेस जाळल्या आहेत. दरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.