उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात शरीराची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तापमान वाढल्यामुळे उष्माघात, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे आणि शरीरात पाण्याची कमतरता यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे दैनंदिन सवयींमध्ये काही छोटे बदल करून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीर सतत हायड्रेटेड ठेवणे. तुम्ही घरी असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा बाहेर प्रवास करत असाल, तरी नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवावी. दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी पित राहिल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. साध्या पाण्यासोबत नारळपाणी, लिंबूपाणी, ताक, बेलाचे सरबत किंवा इतर नैसर्गिक पेयेही घेता येतात.
आहारात करा बदल
उन्हाळ्यात आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. जड, तेलकट आणि खूप मसालेदार पदार्थ टाळावेत. हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा. फळे, भाज्या, ताक, दही आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळतो. अत्यधिक प्रोटीनयुक्त किंवा गरम प्रकृतीचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
उन्हात बाहेर पडताना घ्या काळजी
जर काही कारणाने उन्हात बाहेर जावे लागत असेल, तर डोक्यावर छत्री, टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा. हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. शक्य तितके सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा.
दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळा
दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या वेळेत उन्हाचा तीव्र प्रकोप असतो. या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. जर बाहेर पडणे अत्यावश्यक असेल, तर वारंवार पाणी प्यावे आणि थेट उन्हात जास्त वेळ उभे राहू नये. या छोट्या सवयी पाळल्यास उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.