हरारे, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक याचे २२ ऑगस्ट २०२३ रोजी ४९ व्या वर्षी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून तो आतड्याच्या आणि यकृताच्या कर्करोगाने त्रस्त होता आणि उपचार घेत होता. हीथ स्ट्रीक याची झिम्बाब्वेचा अष्टपैलू क्रिकेटपटू अशीही ओळख होती.
स्ट्रीक झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय सामने खेळला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २१६ बळी घेतले होते. तब्बल १६ वेळा त्याने एका डावात ४ बळी घेतले तसेच त्याने ७ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्ट्रीकने २३९ बळी घेतले आहेत. स्ट्रीकने कसोटी क्रिकेटमध्ये १९९० धावा केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २९४३ धावा केल्या. स्ट्रीकने कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक आणि अकरा अर्धशतके केली तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेरा अर्धशतके केली.
हीथ स्ट्रीकच्या नेतृत्वात झिम्बाब्वेचा संघ २१ कसोटी सामने खेळला. यापैकी चार कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा विजय झाला. तसेच हीथ स्ट्रीकच्या नेतृत्वात झिम्बाब्वेचा संघ ६८ एकदिवसीय सामने खेळला. यापैकी १८ सामन्यात झिम्बाब्वेचा विजय झाला.
निवृत्तीनंतर हीथ स्ट्रीकने झिम्बाब्वे, बांगलादेश, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांसाठी वेगवेगळ्या कालावधीत प्रशिक्षक म्हणून काम केले. पण २०२१ मध्ये आयसीसीने त्याच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आठ वर्षांची बंदी घातली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.