ईडीच्या आठ तास चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिकांना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि ईडी हे एकच असून ते एकत्र काम करतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडीचे धाड पडणार आहे, हे भाजपने आधीच सांगितले होते. म्हणून आश्चर्य वाटले नाही. राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी टोकाची भूमिका कोणीच घेतली नव्हती. परंतु, प्रत्येक गोष्टीची वेळ असते, असे म्हणायचे आणि पुढे वाढायचे. भाजपमधील काही नेते सातत्याने ट्विट करत होते, १५ दिवसांनी अटक होईल, हे आता खरे झाले आहे. त्यामुळे ईडी आणि भाजप एकत्र काम करत असून ते एकच आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, झुकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरकरून लोकांना त्रास द्यायचा, त्यांना भीती दाखवायची. परंतु आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही झुकणार नाही. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष नवाब मलिकांच्या सोबत आहोत, आजही आहोत उद्याही राहू आणि लढाऊ सुरूच ठेवू.’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.