राज्यात काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत असून पुढील दोन दिवसात राज्यात थंडी कायम राहणार आहे. तसेच कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तास हुडहुडी कायम असून मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढणार आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान १० अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच संपूर्ण दिवस वातावरणात गारवा राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. नंदुरबारच्या तोरणमाळ येथे सर्वात कमी म्हणजेच ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये २५ अंशाखाली कमाल तापमान नोंदवण्यात आले.
नाशिकमधील निफाडचा पारा घसरला असून या विभागात ४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सकाळच्या सुमारास या गुलाबी थंडीचा आनंद निफाडवासीयांनी घेतला तर थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. मात्र, या थंडीचा फटका कांदा आणि द्राक्ष बागांना बसणार आहे.
धुले जिल्ह्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून तापमानाचा पारा २.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यातील तापमान पाच अंशाखाली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात थंडी वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुक्या प्राण्यांचे थंडीमुळे हाल होत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.