राम मंदिर उद्घाटनाला अडवाणी, जोशी अनुपस्थित राहणार

राम मंदिर उद्घाटनाला अडवाणी, जोशी अनुपस्थित राहणार

अयोध्या, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राम जन्मभूमी येथील राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे दोघेही अनुपस्थित राहणार आहेत. वय आणि तब्येतीच्या कारणामुळे अडवाणी आणि जोशी उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित असतील. अडवाणी ९६ वर्षांचे आहेत तर जोशींना ५ जानेवारी रोजी ९० वर्ष पूर्ण होतील.

राम जन्मभूमीसाठी मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात रथयात्रेचे नेतृत्व करत लालकृष्ण अडवाणी सहभागी झाले होते. मुरली मनोहर जोशी यांचीही आंदोलनात महत्त्वाची भूमिका होती. यामुळे मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी हे दोन्ही ज्येष्ठ उपस्थित असतील असे अनेकांना वाटत होते. पण तब्येतीच्या कारणामुळे दोन्ही नेते उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित असतील.

उद्घाटन सोहळ्याआधी १६ जानेवारी २०२४ पासून अयोध्येत विशेष धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. गाभाऱ्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुख्य विधी २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी १३ आखाड्यांच्या १५० साधूसंतांना तसेच सहा शंकराचार्यांना आणि इतर २२०० धर्मगुरुंना अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. काशी विश्वनाथ, वैष्णवदेवी अशा प्रमुख मंदिरांच्या प्रतिनिधींना तसेच धर्म आणि घटनात्मक संस्थांच्या प्रतिनिधींनाही अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. दलाई लामा, माता अमृतानंदमयी, योगगुरु बाबा रामदेव, अभिनेता रजनीकांत, अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित – नेने, रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, निर्माता दिग्दर्शक मधुर भांडारकर, उद्योगपती मुकेश अंबानी, उद्योगपती अनिल अंबानी, चित्रकार वासुदेव कामत, इसरोचे संचालक निलेश देसाई यांच्यासह अनेक मान्यवर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहेत.

सामान्यांना २३ जानेवारी २०२४ पासून राम मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेता येईल. राम मंदिर सर्वांसाठी खुले केल्यानंतर २४ जानेवारी २०२४ पासून सलग ४८ दिवस मंदिरात मंडल पूजा होणार आहे. अयोध्येत २५ जानेवारी २०२४ पासून तीन ठिकाणी राम मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने प्रसादाच्या जेवणाचे आयोजन केले जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version