डोंबिवलीतील धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे हे आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांना एका चारचाकी गाडीने धडक देत चक्क फरफटत नेल्याची घटना घडली आहे.हि घटना बुधवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि गाडीत मोठ्या आवाजात डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला होता . मात्र चालकाने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली.
ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर रामनगर पोलीसानी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. ही घटना अनेकांच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. पोलीस हवालदार होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले. या कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.