Year Ender 2025: 2025 हे वर्ष बॉलीवूडसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरले. मोठे बजेट, तगडे स्टारकास्ट, प्रचंड प्रमोशन आणि ओळखीची फ्रँचायझी या सगळ्या गोष्टी असूनही चित्रपटगृहांमधील रिकाम्या खुर्च्यांनी निर्मात्यांना अस्वस्थ केलं. या वर्षी प्रेक्षकांनी एक स्पष्ट संदेश दिला फक्त नाव मोठं असून चालणार नाही, कंटेंटमध्ये दम हवा.
गेल्या काही वर्षांत सिक्वेल्स म्हणजे निर्मात्यांसाठी सुरक्षित पर्याय मानला जात होता. पहिल्या भागाचं यश, ओळखीची पात्रं आणि प्रेक्षकांमध्ये असलेली नॉस्टॅल्जिया यामुळे सिक्वेल्स हमखास चालतात, असा समज पक्का झाला होता. मात्र 2025 मध्ये हा फॉर्म्युला कोलमडताना दिसला.
हृतिक रोशनचा मोठ्या पडद्यावरील परतावा म्हणजे चाहत्यांसाठी उत्सवच. त्यातच ‘War 2’मध्ये ज्युनियर एनटीआरची एंट्री, कियारा अडवाणीचा ग्लॅमर आणि भव्य अॅक्शन या सगळ्यामुळे चित्रपटाकडून अपेक्षा प्रचंड वाढल्या. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्साह लवकरच मावळला.
चित्रपटाची कथा ही पूर्वी पाहिलेल्या अॅक्शन थ्रिलरची आठवण करून देणारी होती. संवाद, प्रसंग आणि ट्विस्ट्समध्ये नावीन्याचा अभाव जाणवला. परिणामी, तब्बल 400 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट पहिल्या ‘War’चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडू शकला नाही. जगभरातून मिळालेली कमाई अपेक्षेपेक्षा कमी ठरली आणि ‘War 2’ हे वर्षातील मोठं अपयश ठरलं.
‘Housefull’ ही फ्रँचायझी म्हणजे मेंदू बाजूला ठेवून पाहायचा चित्रपट, अशी ओळख आधीपासून आहे. मात्र पाचव्या भागात ही अतिरेकाची पातळी गाठली गेली. तोच खून, तेच गैरसमज, तेच भडक लोकेशन्स आणि अत्यंत सुमार विनोद यामुळे प्रेक्षक कंटाळले.
चित्रपटाने 100 कोटींच्या आसपास कमाई केली खरी, पण सोशल मीडियावर प्रेक्षकांचा संताप स्पष्ट दिसला. अनेकांनी हा सिक्वेल पूर्णपणे अनावश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. ‘Housefull 5’ने फ्रँचायझीवरचा विश्वास डळमळीत केला, असं म्हणावं लागेल.
2025 हे वर्ष अजय देवगणसाठी व्यस्त ठरलं. विविध शैलींतील सिक्वेल्समध्ये तो झळकला. ‘Raid 2’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत यश मिळवलं. मात्र ‘Son of Sardaar 2’ आणि ‘De De Pyaar De 2’ या चित्रपटांनी अपेक्षित प्रभाव टाकला नाही.
हे चित्रपट वाईट नव्हते, अभिनय दमदार होता, संवादही मजेशीर होते, पण पहिल्या भागात जी ऊर्जा होती ती यावेळी जाणवली नाही. परिणामी, हे चित्रपट थिएटरमध्ये फार काळ टिकू शकले नाहीत. ओटीटीकडे झुकणाऱ्या प्रेक्षकांचा हा थेट परिणाम असल्याचं चित्रपटसृष्टीत बोललं जात आहे.
अक्षय कुमारचा ‘Kesari Chapter 2’ हा कोर्टरूम ड्रामा समीक्षकांच्या पसंतीस उतरला. आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं. चित्रपटाची मांडणी सशक्त होती, संवाद परिणामकारक होते.
तरीही, मोठ्या प्रमाणात प्रेक्षक थिएटरमध्ये खेचण्यात चित्रपट अपयशी ठरला. ‘ओटीटीवर लवकर येईल’ ही मानसिकता येथेही आड आली. सुमारे 145 कोटींची कमाई करत हा चित्रपट सन्मानजनक ठरला, पण मोठा ब्लॉकबस्टर होऊ शकला नाही.
या सगळ्या गर्दीत ‘Jolly LLB 3’ने मात्र आशेचा किरण दाखवला. सुभाष कपूर यांच्या कथालेखनाची ताकद आणि अरशद वारसी व अक्षय कुमार या दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली. विनोद कमी असला तरी कथानकातील गांभीर्य आणि अभिनयामुळे चित्रपट प्रभावी ठरला.
हा सिक्वेल प्रेक्षकांना थिएटरमध्ये परत आणण्यात यशस्वी ठरला आणि दर्जेदार सिक्वेल कसा असावा, याचं उदाहरण ठरला.
2025 मध्ये बॉलीवूडला एक स्पष्ट धडा मिळाला फक्त सिक्वेलचा टॅग लावून प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचता येणार नाही. आजचा प्रेक्षक हुशार आहे, पर्यायांनी भरलेला आहे आणि कंटेंटबाबत अधिक सजग आहे.
ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे, थिएटरमध्ये जाण्यासाठी प्रेक्षकाला ‘खास अनुभव’ हवा आहे. त्यामुळे पुढील काळात बॉलीवूडला नव्या कथा, धाडसी प्रयोग आणि दर्जेदार लेखनावर भर द्यावा लागणार आहे. अन्यथा, सिक्वेल्सची जादू कायमची हरवण्याची भीती नाकारता येणार नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.