पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोते भरून खोटे दागिने सापडल्याचे मंदिरातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. यामागे काही भाविक खोटे दागिने टाकत असल्याचे कारण सांगत मंदिर प्रशासनाने स्वत:चे हात झटकले आहेत. या प्रकरणी मंदिरातीलच संबंधित कर्मचारी आणि अधिकारी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवले असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या प्रकरणाची शासनाने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे. तसे निवेदनही समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले आहे.
मंदिर प्रशासनाच्या कारभारात दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे, हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे, प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे, मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे, मंदिरातील गोधन कसायांना विकणे, ४८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने २००० ते २०१० या कालावधीत मंदिराला ४७.९७ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागणे असे अनेक घोटाळे हिंदू जनजागृती समितीने उघड केले आहेत. यामुळे मंदिर समितीकडून विठ्ठलाच्या दानपेटीत बनावट दागिने सापडणे यामध्येही काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय समितीच्या पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.