Nitish Kumar Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेने नितीश कुमार यांच्यावर विश्वासाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या आरोग्याबद्दल आणि नेतृत्वाबद्दल महाआघाडीने उभे केलेले प्रश्न जनतेने फेटाळून लावत एनडीएला स्पष्ट बहुमत दिले. तेजस्वी यादव यांची आश्वासने लोकांना पटली नाहीत. तथापी, प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षसुद्धा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. नितीश कुमार यांच्या या दणदणीत विजयामागील पाच मोठी कारणे कोणती? ते जाणून घेऊयात
नेतृत्वावरचा ठाम विश्वास
2000 साली प्रथमच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितीश कुमार यांनी गेल्या दोन दशकांत अनेक राजकीय समीकरणांमध्ये बदल केले, पण सत्ता त्यांच्या हातातच राहिली. आतापर्यंत त्यांनी तब्बल नऊ वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे आणि आता दहाव्या कार्यकाळाची तयारी सुरू आहे. महाआघाडीने त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करून दबाव निर्माण केला, पण भाजपने सातत्याने नितीश यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आणि अखेरीस मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला.
विक्रमी मतदान टक्केवारी
यावेळी बिहारमध्ये झालेल्या मतदानाने ऐतिहासिक नोंद केली.
पहिला टप्पा: 65.08 टक्के
दुसरा टप्पा: 69.20 टक्के
एकूण मतदान: 67.13 टक्के बिहारच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान
उच्च मतदान हे सहसा सत्ताविरोधी लाट किंवा सत्ताधारी आघाडीला मिळणारा मोठा पाठिंबा दर्शवते. यावेळी जेडीयूची मतांची टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा तीन टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याचे समोर आले. या वाढलेल्या मतदानाचा थेट फायदा नितीश कुमार यांना झाला आणि त्यांची पक्षाची कामगिरी आरजेडीपेक्षा पुढे राहिली.
महिलांचा निर्णायक पाठिंबा
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या विजयाचे एक प्रमुख कारण महिला मानल्या जात आहेत. नितीशकुमार यांना मुलींना सायकली देण्यापासून ते महिलांच्या खात्यात थेट 10 हजार रुपये हस्तांतरित करण्यापर्यंतच्या योजनांचा फायदा झाला आहे. निवडणुकीच्या अगदी आधी, नितीश कुमार यांनी जवळपास 1.5 कोटी महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये ट्रान्सफर केले. मतदानादरम्यानही त्याचा परिणाम दिसून आला, जेव्हा दोन्ही टप्प्यांमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त संख्येने मतदान केले. पहिल्या टप्प्यात, पुरुषांपेक्षा 7.48 टक्के अधिक महिलांनी मतदान केले आणि दुसऱ्या टप्प्यात, 10.15 टक्के अधिक महिलांनी मतदान केले. सुपौल, किशनगंज, पूर्णिया आणि कटिहारमध्ये 80 टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदान केले.
विखुरलेला विरोध
महाआघाडीमध्ये शेवटपर्यंत जागावाटप ठरत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही जागांवर महाआघाडीचेच उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले. याउलट एनडीएने अतिशय लवकर आणि स्पष्ट जागावाटप जाहीर केले. महाआघाडीमधील उशीर, अंतर्गत मतभेद आणि अस्पष्ट धोरणांची किंमत त्यांना मोठ्या पराभवात मोजावी लागली.
मोदी + नितीश = डबल इंजिन सरकारचा प्रभाव
एनडीएने हा संदेश ठळकपणे दिला की बिहारच्या विकासासाठी “डबल इंजिन सरकार” आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणि नितीश कुमार यांची स्थिर नेतृत्वशैली या संयोगामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. भाजपची चिराग पासवान यांच्याशी असलेली जुळवाजुळवही एनडीएला अतिरिक्त बळ मिळवून गेली. दुसरीकडे, आरजेडीने लालू-राबडी सरकारच्या प्रतिमेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, पण “जंगल राज” चे सावट त्यांच्या प्रचारावर राहिलेच.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.