विक्रम लँडरचे चंद्रावर दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग

विक्रम लँडरचे चंद्रावर दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : विक्रम लँडरने चंद्रावर दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग केले. या प्रयोगासाठी विक्रम लँडरचे इंजिन पुन्हा सुरू करण्यात आले. नंतर लँडर चंद्राच्या जमिनीवरून चाळीस सेमी उंच उडाले आणि पुन्हा खाली येऊन स्थिरावले. भविष्यात चंद्रावरचे नमुने घेऊन यानाला पृथ्वीवर यायचे असेल तर ते शक्य आहे का याची चाचणी या निमित्ताने घेण्यात आली. (बातमीतील फोटो : साभार इसरो)

प्रयोग यशस्वी झाला असून विक्रम लँडरची सर्व उपकरणे दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग केल्यानंतरही व्यवस्थित कार्यरत आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या जमिनीवरून उड्डाण करण्याआधी चेस्ट (ChaSTE), इलसा (ILSA) ही उपकरणे बंद केली होती आणि प्रज्ञानला बाहेर काढणारा रँप गुंडाळला होता. दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चेस्ट (ChaSTE) आणि इलसा (ILSA) ही उपकरणे पुन्हा सुरू करण्यात आली. रँप पण आधी होता तसाच बाहेर काढून ठेवण्यात आला आहे.

प्रज्ञान ‘स्लीप मोड’वर

सध्या चंद्रावर रात्र सुरू आहे. प्रज्ञान रोव्हर ‘स्लीप मोड’वर आहे. रोव्हरवरची इलेक्ट्रॉनिक आणि वैज्ञानिक उपकरणे बंद आहेत. रात्रीच्या वेळी चंद्रावर कडाक्याची थंडी पडते. या वातावरणात टिकाव धरला तर सूर्योदय झाल्यावर रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. चंद्रावर सूर्योदय होताच प्रज्ञान रोव्हरचे सोलर पॅनल पुन्हा ऊर्जा ग्रहण करेल. यानंतर रोव्हर पुन्हा कार्यरत होतो का याकडे अनेकांचे लक्ष आहे. चंद्रावर आता २२ सप्टेंबर रोजी सूर्योदय होईल. यावेळी रोव्हर पुन्हा कार्यरत झाले तर इसरोसाठी आणखी संशोधन करू शकेल. रोव्हर सुरू झाले नाही तर तो भारताचा प्रतिनिधी म्हणून कायमचा चंद्रावर रहणार आहे.

प्रज्ञान रोव्हरचा प्रवास

चंद्रावर शिवशक्ती पॉइंट येथे उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने पुढे शंभर मीटर अंतरापर्यंत प्रवास करून संशोधन केले. हे संशोधन सुरू असताना अधूनमधून इसरोने विक्रम लँडरद्वारे काढलेले प्रज्ञान रोव्हरचे निवडक फोटो सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले. तर एकदा रोव्हरने विक्रम लँडरचा फोटो काढले. हे फोटो पण इसरोने सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version