Vande Bharat Sleeper: भारतीय रेल्वेच्या आधुनिक प्रवासाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकलं गेलं आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनने राजस्थानमधील कोटा–नागदा विभागात तब्बल 180 किमी प्रतितास वेगाने यशस्वी धाव घेतली, आणि या चाचणीने देशातील सेमी-हायस्पीड रेल्वे प्रवासाला नवा आयाम दिला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः सोशल मीडियावर या चाचणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनचा वेग मोबाईल स्क्रीनवर 182 किमी प्रतितास दाखवत असतानाच, ट्रेनमध्ये रचून ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या ग्लासमधील पाणी सांडत नसल्याचं स्पष्ट दिसतं. ही चाचणी म्हणजेच ट्रेनच्या स्थिरतेचं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं जिवंत उदाहरण मानलं जात आहे.
या चाचणीदरम्यान Commissioner of Railway Safety (CRS) यांच्याकडून ट्रेनची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, वेगाच्या चाचणीसोबतच तथाकथित “वॉटर टेस्ट” देखील करण्यात आली, ज्यातून ट्रेन उच्च वेगातही किती संतुलित राहते, हे सिद्ध झालं.
सध्या भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा कमाल ऑपरेशनल वेग 160 किमी प्रतितास आहे, मात्र त्यांची डिझाईन स्पीड क्षमता 180 किमी प्रतितास इतकी आहे. ही स्लीपर आवृत्ती प्रत्यक्षात त्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकते, हे या चाचणीमुळे स्पष्ट झालं आहे. रेल्वे मंत्रालयानुसार, ट्रेनचा सरासरी वेग ट्रॅकची रचना, वळणं, थांबे आणि देखभाल कामांवर अवलंबून असतो.
Vande Bharat Sleeper tested today by Commissioner Railway Safety. It ran at 180 kmph between Kota Nagda section. And our own water test demonstrated the technological features of this new generation train. pic.twitter.com/w0tE0Jcp2h — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 30, 2025
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी गेम-चेंजर ठरणार आहे. एसी स्लीपर कोच, आधुनिक सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि उच्च वेग यांचा मिलाफ या ट्रेनमध्ये असणार आहे. त्यामुळे दीर्घ अंतराचा प्रवास कमी वेळात आणि अधिक आरामदायी होणार आहे.
वर्षअखेरीच्या आढाव्यात रेल्वे मंत्रालयाने सांगितलं की, सुरुवातीला ही स्लीपर ट्रेन देशातील व्यस्त मार्गांवर धावणार असून, पुढील काळात हळूहळू इतर मार्गांवरही सुरू केली जाणार आहे. यामुळे विमान प्रवासाला पर्याय म्हणून रेल्वेचा वेगवान आणि सुरक्षित पर्याय प्रवाशांना मिळणार आहे.
दरम्यान, वंदे भारत ट्रेनचं नेटवर्कही झपाट्याने विस्तारत आहे. नुकतंच चेन्नई ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार करण्यात आला आहे. चेन्नई ते नरसापूरम दरम्यान सुरू झालेल्या या सेवेमुळे प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी भर पडली आहे. एकूणच, वंदे भारत स्लीपर ट्रेनची ही यशस्वी चाचणी म्हणजे भारतीय रेल्वेच्या भविष्याचा वेग दाखवणारा टप्पा ठरत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.