Gautam Adani: गौतम अदानींना अमेरिकेतून मोठा दिलासा; फसवणूक प्रकरण कायमचं बंद, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी

अमेरिकेने गौतम अदानी यांच्यावरील फौजदारी प्रकरण मागे घेतल्याने अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Gautam Adani: गौतम अदानींना अमेरिकेतून मोठा दिलासा; फसवणूक प्रकरण कायमचं बंद, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी

Gautam Adani: अदानी समूहासाठी मोठा दिलासादायक निर्णय समोर आला असून अमेरिकेतील न्याय विभागाने गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधातील फौजदारी फसवणूक प्रकरण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीनंतर शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनीही या निर्णयाचे सकारात्मक स्वागत केल्याचे चित्र दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) या प्रकरणात पुढील संसाधने खर्च न करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये “प्रॉसिक्युटोरियल डिस्क्रेशन” म्हणजेच सरकारी अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, अमेरिकेची सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) देखील या संबंधित नागरी प्रकरणात समझोत्याच्या दिशेने पुढे सरकली आहे. या सेटलमेंटअंतर्गत अदानी समूहाकडून कोणतीही चूक मान्य करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: PM Modi Norway Visit: भारत-नॉर्वे मैत्रीचे नवे पर्व; पंतप्रधान मोदींना प्रतिष्ठेचा 'रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' पुरस्कार प्रदान

हे संपूर्ण प्रकरण 2024 मध्ये चर्चेत आले होते. अमेरिकन तपास यंत्रणांनी असा आरोप केला होता की, अदानी ग्रीन एनर्जीशी संबंधित सौरऊर्जा प्रकल्पांसाठी भारतीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देण्यात आले. या प्रकल्पांमधून भविष्यात अब्जावधी डॉलरचा नफा अपेक्षित असल्याचे सांगितले जात होते. तसेच अमेरिकन गुंतवणूकदारांना निधी उभारणीदरम्यान अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता.

तपासादरम्यान अदानी समूहाने अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून अब्जावधी डॉलरचे कर्ज आणि बाँडद्वारे निधी उभारल्याचे समोर आले होते. मात्र, या व्यवहारांमध्ये कथित भ्रष्टाचाराशी संबंधित माहिती लपवण्यात आल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गौतम अदानी यांचे वकील आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय वकील रॉबर्ट जिउफ्रा यांनी अदानी समूह अमेरिकेत तब्बल 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करू इच्छित असल्याचे म्हटले होते. मात्र, सुरू असलेल्या खटल्यांमुळे या योजनांवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

हेही वाचा: Mission Moon: अंतराळ प्रवास होणार स्वस्त! शास्त्रज्ञांनी शोधलं इंधन वाचवणारं नवं तंत्रज्ञान; आता 'मिशन मून'ला मिळणार गती

या सर्व घडामोडींनंतर शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांत चांगली वाढ नोंदवली गेली आहे. तसेच अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्येही सकारात्मक हालचाल दिसून आली. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढत असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

अमेरिकेतील या निर्णयामुळे अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात समूहाच्या जागतिक विस्तार योजनांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version