राज्यात गेल्या काही दिवसांपासून मविआमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दोन चार भाजपावाल्यांना आत टाकायला हवं, असा सल्ला खडसेंनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जळगावच्या दौऱ्यावर असून एका आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे म्हणत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, मी अनेकदा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवण्यास सांगतो. भाजपाची अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे दोन-चार भाजपावाल्यांना आत टाकलं असतं तर आता ही परिस्थिती आली नसती, असे एकनाथ खडसे म्हणाले.
तसेच, जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचं राजकारण करू नका. परंतु ज्यांनी केले आहे त्यांना भोगायला लावा, मग ही परिस्थिती उद्भवणार नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरूनही एकनाथ खडसेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोणतेही कारण नसताना देशमुखांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. तसेच मलाही उगाच अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु मी तुरुंगात गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा, असा इशारा खडसेंनी दिला आहे.
दरम्यान, यावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री कोण आहे?, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.