अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनरदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सीक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांचे कौतुक करत सांगितले की उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स तसेच कॅबिनेटमधील सर्व सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. हल्लेखोराला तात्काळ अटक करण्यात आली असून जखमी पोलिस अधिकारीही सध्या धोक्याबाहेर आहे.
ही घटना अत्यंत अनपेक्षित असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की शस्त्रांनी सज्ज असलेला एक व्यक्ती सुरक्षा तपासणी केंद्रातून आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सतर्क असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी वेगाने कारवाई करत त्याला नियंत्रणात आणले आहे. त्यांच्या धाडसी आणि तातडीच्या प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हल्लेखोराबाबत माहिती देताना त्याची ओळख कोल टॉमस ॲलन अशी असल्याचे सांगितले. हा 31 वर्षीय व्यक्ती कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून त्याच्याकडे अनेक शस्त्रे आढळली आहेत. सध्या सुरक्षा यंत्रणा त्याची सखोल चौकशी करत असून या हल्ल्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.
या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली होती. मात्र त्याने परिधान केलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला. जवळून शक्तिशाली शस्त्रातून गोळी झाडण्यात आली होती, तरीही संबंधित अधिकारी सुरक्षित असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.
या घटनेपूर्वी ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती देताना सांगितले होते की सुरक्षा यंत्रणांच्या सूचनेनुसार कार्यक्रमस्थळ तातडीने रिकामे करण्यात आले. त्यांनी स्वतः, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष आणि कॅबिनेट सदस्य सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, ही घटना वॉशिंग्टनमधील वॉशिंग्टन हिल्टन हॉटेल येथे सुरू असलेल्या डिनर कार्यक्रमादरम्यान घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुरक्षा दलांनी तातडीने प्रत्युत्तर देत हल्लेखोराला पकडले आणि परिस्थिती नियंत्रणात आणत मोठा अनर्थ टाळला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.