Drunk Man Viral Video: निजामाबादचा ‘तिरुपती’ तिरुपतीतच चढला कळसावर! अजब मद्यपीचा ‘गजब’ पराक्रम; सुरक्षा यंत्रणेला फुटला घाम

काही तास चाललेल्या थरारानंतर पोलिस व अग्निशमन दलाने त्याला सुरक्षित खाली उतरवले असून मंदिर सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Drunk Man Viral Video: निजामाबादचा ‘तिरुपती’ तिरुपतीतच चढला कळसावर! अजब मद्यपीचा ‘गजब’ पराक्रम; सुरक्षा यंत्रणेला फुटला घाम

तिरुपती: भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती येथील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात गुरुवारी एका विचित्र आणि थरारक घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. एका मद्यधुंद व्यक्तीने सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन थेट मंदिराच्या उंच ‘गोपुरावर’ चढून कळसापर्यंत धडक मारली. या प्रकारामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमध्ये भीती आणि आश्चर्याचे वातावरण पाहायला मिळाले.

कुट्टाडी तिरुपती (45) नावाची ही व्यक्ती तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. इतर भाविकांप्रमाणेच त्याने मंदिरात प्रवेश केला, मात्र तो नशेत होता. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, मंदिर परिसरात असलेल्या तंबूच्या खांबांचा आधार घेत त्याने ‘नदीमी गोपुरम’वर चढायला सुरुवात केली. तो इतक्या वेगाने वर गेला की, सुरक्षा रक्षक काही समजायच्या आत तो थेट कळसाजवळ पोहोचला होता.

मद्यपी व्यक्ती गोपुराच्या टोकावर पोहोचल्याचे दिसताच मंदिर प्रशासनाचे धाबे दणाणले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. गोपुराच्या अरुंद नक्षीकामात तो अडकून पडला होता, ज्यामुळे त्याला खाली उतरवणे मोठे आव्हान होते. जवळपास काही तास हा थरार सुरू होता आणि खाली हजारो भाविकांची गर्दी जमा झाली होती.

हेही वाचा: PIB Fact Check: 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? मोठी माहिती समोर

अतिशय कडक सुरक्षा असलेल्या तिरुपती मंदिर संकुलात एक मद्यधुंद व्यक्ती इतक्या उंचावर कशी काय पोहोचू शकते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दक्षता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने नशेत असल्याने हा प्रकार केला असावा. मात्र, यामुळे मंदिराच्या पवित्रतेला बाधा पोहोचल्याची भावना काही भाविकांनी व्यक्त केली आहे.

नदीमी गोपुरमवर चढलेला कुट्टाडी तिरुपती हा निजामाबादच्या पेद्दामल्ला रेड्डी कॉलनीतील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या या कृत्यामुळे केवळ त्याचाच जीव धोक्यात आला नव्हता, तर मंदिराच्या ऐतिहासिक गोपुराच्या वास्तूलाही हानी पोहोचण्याची शक्यता होती. पोलिसांनी त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरवल्यानंतर ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. “हे कसं शक्य आहे?” असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. या प्रकारानंतर मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्याचे संकेत दिले असून, मंदिराच्या गोपुरांजवळ असलेले खांब किंवा आधार तात्काळ हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दैव बलवत्तर म्हणून कोणताही मोठा अपघात झाला नाही, अशीच भावना सध्या तिरुपतीमध्ये व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Mumbai Local Mega Block: महत्त्वाची बातमी! मुंबई लोकलचा रविवारी ‘चक्का जाम’; पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा ब्लॉक, कोणत्या मार्गावर काय परिणाम?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version