तिरुपती : देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या पवित्र लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपासंदर्भात मोठा फसवणूक घोटाळा उघडकीस आला आहे. CBI च्या तपासात समोर आलं आहे की उत्तराखंडमधील एका डेअरीने 5 वर्षांत तब्बल 68 लाख किलो तूप पुरवलं, ज्याची किंमत सुमारे 250 कोटी रुपये होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या डेअरीनं कधीही दूध किंवा लोणी विकतच घेतलं नव्हतं. हा प्रकार 2019 ते 2024 दरम्यान घडला असून, हे तूप पवित्र लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरले जात होते, जे दरवर्षी लाखो भक्त खरेदी करतात.
CBI च्या तपासात समोर आलं की हे तूप मिलावटी आणि रासायनिक पदार्थ मिसळून तयार केलेले होते. हा प्रकार बाहेर आल्याने तिरुपती देवस्थानम प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेला हा भ्रष्टाचार पाच वर्षांपर्यंत कोणाच्याही लक्षात आला नाही. तपासानुसार, हरिद्वार जिल्ह्यातील ‘भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरी’ नावाच्या कंपनीचे मालक पामिल जैन आणि विपिन जैन यांनी बनावट तूप उत्पादन युनिट उभं केलं. त्यांनी दूध आणि लोणी खरेदीचे खोटे बिल्स आणि कागदपत्रं तयार करून पेमेंट रेकॉर्डमध्ये फेरफार केली, ज्यामुळे नियमित उत्पादन सुरू असल्याचं दाखवलं जात होतं.
CBI च्या चौकशीत अटक केलेल्या एका आरोपीने कबूल केलं की, तो या डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि अॅसिटिक अॅसिड एस्टर सारखी रसायनं पुरवत होता. हे रसायन औद्योगिक मिलावट आणि खाद्यप्रक्रियेमध्ये वापरले जाते, ज्यामुळे तूप अधिक घट्ट आणि टिकाऊ दिसतं. म्हणजेच, हे ‘तूप’ प्रत्यक्षात रासायनिक मिश्रण होतं, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अजून एक मोठा खुलासा म्हणजे तिरुमला देवस्थानने या डेअरीला 2022 मध्ये ब्लॅकलिस्ट केलं होतं, तरीदेखील तूप पुरवठा सुरूच राहिला. आरोपींनी इतर नावांखाली वैष्णवी डेअरी (तिरुपती), मालगंगा डेअरी (उत्तर प्रदेश) आणि AR डेअरी फूड्स (तमिळनाडू) या नावांनी नवीन टेंडर घेतले आणि तूप पुरवठा सुरू ठेवला.
CBI च्या अहवालानुसार, या तुपात जनावरांच्या चरबीचाही वापर करण्यात आला होता. जुलै 2024 मध्ये तिरुमला देवस्थानने AR डेअरीकडून आलेले चार टँकर तूप मिलावटी असल्याने नाकारले होते. मात्र हे टँकर परत न जाता थेट वैष्णवी डेअरीच्या प्लांटवर पोहोचले, अशी माहिती FSSAI आणि SIT च्या संयुक्त तपासात समोर आली आहे. या प्रकरणामुळे तिरुपतीच्या लाडूंवरील भक्तांचा विश्वास डळमळीत झाला आहे. देशभरातून येणारे लाखो भक्त या प्रसादाला पवित्रतेचं प्रतीक मानतात, आणि त्यामुळेच या घोटाळ्याने भावनिक संतापही उसळला आहे.
सध्या CBI ची विशेष तपास टीम संबंधित सर्व डेअरी, पुरवठादार आणि देवस्थानम प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करत आहे. या प्रकाराने धार्मिक संस्थांमधील पारदर्शकता आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे, आणि देशभरात भविकांच्या यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा: Gujarat ATS: गुजरात एटीएसने आणली दहशतवादी साखळी उघडकीस; चिनी पदवीधारक डॉक्टरसह तिघे अटकेत
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.