बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आलाय. संपूर्ण जिल्ह्यातील 264 जिल्हा परिषद शाळेच्या इमारती आणि 460 वर्गखोल्या धोकादायक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत असताना, जीर्ण भिंतीचा काही भाग चौथीचा विद्यार्थी कुंदन विजय ओव्हाळ याच्या अंगावर पडून मुलाच्या हाताला जखम झाली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या कामखेडा गावांमध्ये घडली आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बीड तालुक्यातील कामखेडा गावातील जिल्हा परिषेची उर्दू आणि मराठी माध्यमाची शाळा आहे. 1950 पासून या शाळेत अनेक विद्यार्थी घडले आहेत. मात्र याच शाळेच्या इमारतीच्या भिंतीकडे आणि छताकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने आज या शाळेची दुरवस्था झाली आहे.
मराठी आणि उर्दू शाळेचे जवळपास 200 विद्यार्थी असलेल्या या शाळेतील काही वर्गखोल्यांचे छत, भिंती आणि पत्रदेखील तुटलेले आहेत. तर पर्यायी व्यवस्था नसल्याने, याच शाळेतील एका वर्ग खोलीत, चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात होते. यादरम्यान अचानक जीर्ण वर्ग खोलीच्या भिंतीचा, काही भाग चिमुकल्या कुंदन ओव्हाळ याच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.