पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची २९ मे रोजी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर पंजाबसह संपूर्ण गायन उद्योगात शोककळा पसरली आहे. पंजाबमधील गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा कॅनडा येथे राहणारा साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे.
तर, बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. सलमानचे वडील सलीम खान यांनाही पत्राच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स २०१८मध्ये तुरुंगात असताना त्याने सलमानला धमकी दिली होती. तुरुंगात असूनही लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानच्या हत्येचा कट रचला.
दरम्यान, सलमान खान आणि वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून चाहत्यांनी समाज माध्यमांवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच या धमकीच्या पत्रानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.