गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये बुधवारी रात्री सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे १३ ते १५ बोटी समुद्रात बुडण्याची भीती आहे. या बोटीत अनेक मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील ८ ते १० मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. बुधवारपासून बिघडलेले हवामान पाहता, हवाई विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात बुधवारपासून सतत पाऊस पडत आहे आणि आयएमडीनुसार येत्या ४८ तासात येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांसाठी ५ दिवसांचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचवेळी ओडिशा आणि आंध्रवर ‘जोवाड’ चक्रीवादळाची छाया पसरली आहे.
ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच आता जोवाड चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती ३ डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.