Toxic Oil Rain: बापरे! इराणमध्ये पावसाचा थेंब पडताच होतोय मृत्यू; युद्धाचा नेमका काय विषय आहे?

इराण-इस्रायल संघर्षामुळे तेहरानमधील तेल डेपो आणि रिफायनरीवरील हल्ल्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर आणि रसायने पसरली आहेत.
Toxic Oil Rain: बापरे! इराणमध्ये पावसाचा थेंब पडताच होतोय मृत्यू; युद्धाचा नेमका काय विषय आहे?

तेहरान: मागील नऊ दिवसांपासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या महाभयंकर रणधुमाळीने आता कल्पनेपलीकडचे रौद्र रूप धारण केले आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने केवळ भूमीच नाही, तर आता आभाळही विखारी केले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये सध्या थरारक दृश्य पाहायला मिळत असून, तिथे चक्क ‘काळा विषारी पाऊस’ कोसळू लागला आहे. हा पाऊस म्हणजे निसर्गाचा प्रकोप नसून, मानवनिर्मित विनाशाची ही एक भीषण नांदी मानली जात आहे.

शनिवारी रात्री इस्रायल आणि अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी तेहरानमधील ‘शाहरान फ्यूल डेपो’ आणि ‘अल्बोर्ज’ या अवाढव्य तेल शुद्धीकरण केंद्रांवर क्षेपणास्त्रांचा नरसंहार घडवून आणला. या भीषण स्फोटांनी आकाशात धुराचे काळेकुट्ट डोंगर उभे केले आणि लाखो गॅलन तेल वातावरणात बाष्पाच्या रूपात पसरले.

रविवारी सकाळी जेव्हा पाऊस सुरू झाला, तेव्हा त्याचे स्वरूप पाहून जगाचा काळजाचा थरकाप उडाला. हा साधा पाऊस नसून गडद काळा आणि तेलाचा उग्र वास असलेला होता. जणू निसर्गच इराणच्या नशिबावर काळी शाई सांडत असल्याचा भास होत होता.

हेही वाचा: Share Market Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच रेड अलर्ट! सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 550 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचा डोक्याला हात

इराणी रेड क्रिसेंटने जारी केलेला आपत्कालीन इशारा कोणत्याही हॉलीवूडच्या ‘डिझास्टर’ चित्रपटापेक्षा कमी नाही. हा पाऊस सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्सचे एक जीवघेणे ‘टॉक्सिक कॉकटेल’ आहे. या पावसाचा एक थेंबही शरीरावर पडल्यास त्वचा भाजणे किंवा कायमस्वरूपी जखमा होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यातील विषारी वायू फुफ्फुसांना निकामी करू शकतात, अशा इशाऱ्यामुळे संपूर्ण तेहरानमध्ये मृत्यूची शांतता पसरली आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे कडक आदेश दिले आहेत.

एकीकडे हा ‘काळा पाऊस’ जीव घेत असताना, इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ने ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने आखाती देशांमधील महत्त्वाच्या तळांवर एकामागून एक ड्रोन हल्ले चढवून युद्धाचा वणवा पेटवला आहे. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाक्यांना लक्ष्य केल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. इराणने केवळ तेलावरच नाही, तर आता पाणीपुरवठ्यावरही घाला घातला आहे. बहरीनच्या वॉटर प्लांटवर हल्ला करून इराणने जगाला इशारा दिला आहे की, “जर आमची संसाधने नष्ट केली, तर संपूर्ण जगाचा घसा कोरडा राहील.”

इराण सध्या निसर्ग आणि महासत्ता अशा दोन आघाड्यांवर एकाकी झुंज देत आहे. इस्रायलच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरही इराणने क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून बदला घेण्यास सुरुवात केली आहे. हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता आता जागतिक शांततेला गिळंकृत करू पाहत आहे.

तेहरानमधील हा काळा पाऊस म्हणजे भविष्यात येणाऱ्या महाविनाशाचे प्रतीक तर नाही ना? या प्रश्नाने सध्या संपूर्ण जगाला चिंतेच्या गर्तेत ढकलले आहे. पश्चिम आशियातील हा संघर्षाचा जाळ आता कुठे जाऊन थांबणार, याकडे साऱ्या जगाचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा: Rupee Historic Fall: रुपयाला ‘युद्धा’चा फटका! डॉलरच्या तुलनेत 92.49 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर; पाहा तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version