खरिपाच्या पेरणीसाठी जिल्ह्यात पाहिजे तेवढा पाऊस झाला नसला तरी सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र आता सोयाबीन पिकावर शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याचे पहायला मिळते आहे. दोन-तीन दिवसापासून सतत संततधार पावसामुळे उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, उपळा, तेर, हिंगळजवाडी, येडशी या परिसरात आणि कळंब,भुम,तुळजापूर या तालुक्यात देखील सोयाबीन पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव पहिला मिळतो आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. त्वरीत पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे
एरव्ही शांत आणि मंद हालचाली असणाऱ्या शंखी गोगलगाई गेल्या पंधरा दिवसांत आपली दहशत निर्माण केली आहे. सोयाबीनसह इतर पिकांवर गोगलगाईच्या हल्ल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. याचे कारण उशिराने होत असलेली नांगरणी, बांधाच्या साफसफाईकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी सांगितले आहे .
गोगलगायमुळे बहुतांश पिकांना फटका बसला असला, तरी यामध्ये सोयाबीनचा वरचा क्रमांक आहे. इतर पिकांपेक्षा गोगलगाय सोयाबीनकडेच आकर्षीत होत असून, अंबाजोगाईसह जिल्ह्यात सोयाबीनचा वाढलेला पेरा गोगलगायींसाठी मेजवाणी ठरत आहे.गोगलगाय नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. गोगलगाय एकाच वेळी १०० ते १५० अंडी घालत असल्याने त्यांचे प्रमाण वाढण्यापूर्वी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच पेरणीपूर्वी किमान दोन महिने नांगरणी करणे गरजेचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.