मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज आठवड्याच्या अखेरच्या व्यवहारात सुरुवातीला घसरण दिसून आली, मात्र काही वेळातच बाजाराने पुन्हा सावरत हिरव्या निशाणावर प्रवेश केला. सेन्सेक्स 154 अंकांनी वाढून 78,142 वर पोहोचला, तर निफ्टी 16 अंकांनी वाढून 24,216 च्या आसपास व्यवहार करत होता.
सकाळच्या सुरुवातीला सेन्सेक्स 12 अंकांनी घसरून 77,976 वर उघडला होता. निफ्टीनेही 30 अंकांची घसरण घेत 24,166 वर व्यवहार सुरू केला. मात्र गुंतवणूकदारांनी नंतर खरेदीकडे वळल्याने बाजार पुन्हा वर आला.
काही दिवसांपूर्वी बाजारात किरकोळ घसरण झाली होती. सेन्सेक्स 122 अंकांनी घसरून 77,988 वर बंद झाला होता, तर निफ्टी 34 अंकांनी कमी होऊन 24,196 वर स्थिरावला होता. बँक निफ्टीमध्येही 215 अंकांची घसरण झाली होती.
आशियाई बाजारांमध्ये आज नकारात्मक वातावरण दिसून आले. जपानचा निक्केई निर्देशांक जवळपास एक टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँग सेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 निर्देशांकही लाल निशाणावर व्यवहार करत होते. फक्त चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक किरकोळ वाढीसह स्थिर राहिला.
अमेरिकन बाजारातून मात्र सकारात्मक संकेत मिळाले. एस अँड पी 500, नॅस्डॅक आणि डाऊ जोन्स या तिन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये गुरुवारी वाढ झाली. त्यामुळे भारतीय बाजारालाही काही प्रमाणात आधार मिळाला.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 93.27 डॉलर प्रति बॅरलवर आले, तर ब्रेंट क्रूड 98.3 डॉलर प्रति बॅरलवर घसरले. तेलाच्या किंमतीतील ही घट भारतासाठी सकारात्मक मानली जाते, कारण त्यामुळे आयात खर्च कमी होऊ शकतो.
पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची शक्यता हेही बाजारासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. इस्रायल आणि लेबनान यांनी 10 दिवसांच्या संघर्षविरामावर सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चाही पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.