India Russia Relations: चीनला स्वस्त तेल, भारताला ‘नो एंट्री’? अमेरिकेच्या धोरणामुळे पुतिन यांनी फिरवली भारताकडे पाठ?

रशियन तेल खरेदीवरून अमेरिका आणि भारतात तणाव निर्माण झाला असून त्याचा थेट फायदा चीनला होताना दिसत आहे.
India Russia Relations: चीनला स्वस्त तेल, भारताला ‘नो एंट्री’? अमेरिकेच्या धोरणामुळे पुतिन यांनी फिरवली भारताकडे पाठ?

नवी दिल्ली: सध्या जागतिक राजकारणात तेलाच्या अर्थकारणावरून 'राजकीय' घडामोडी सुरू असल्याचे चित्र आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदीवरून प्रचंड दबाव टाकला होता. भारताला रशियाचे 'लॉन्ड्रोमॅट' (Laundromat) म्हणण्यापर्यंत अमेरिकेची मजल गेली होती. सुरुवातीला या दबावाला न जुमानता भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली; मात्र, अमेरिकेने टॅरिफ आणि निर्बंधांचे हत्यार उपसल्याने भारताची स्थिती 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी झाली आहे. आता या आंतरराष्ट्रीय राजकीय तणावाचा थेट फायदा चीनला होताना दिसत असून, भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

अमेरिकेने नुकतेच भारतावरील काही आर्थिक निर्बंध आणि टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यामागे एक मोठी मुत्सद्दी खेळी आहे. अमेरिकेचा दावा आहे की, भारताने सध्या रशियाकडून होणारी तेल आयात थांबवली आहे. मात्र, अमेरिकेचा हा केवळ वरकरणी दिलासा असून, त्यामागे भारताला व्हेनेझुएलाच्या तेलाकडे वळवण्याचा डाव आहे. व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर आणि अर्थकारणावर अमेरिकेचे मोठे नियंत्रण आहे. भारतासारखा मोठा ग्राहक रशियापासून दूर करत व्हेनेझुएलाकडे वळवल्यास, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचे अमेरिकेचे मनसुबे स्पष्ट दिसत आहेत.

हेही वाचा: Tanaji Sawant Audio Clip : "कोटी, दोन कोटी, काय लागतील ते जाऊ दे", सावंतांच्या व्हायरल क्लिपने उडवली खळबळ

भारताच्या या बदलत्या भूमिकेची कुणकुण लागताच रशियानेही तातडीने आपली पावले उचलली आहेत. 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' याप्रमाणे रशियाने आता चीनला सर्वात जवळचे मित्र मानत, तेलाच्या निर्यातीत मोठ्या सवलती (Discounts) देण्यास सुरुवात केली आहे. 'रॉयटर्स'च्या अहवालानुसार, रशियाने या आठवड्यात चीनला दिल्या जाणाऱ्या तेलाच्या दरात मोठी कपात केली आहे. चीन हा आधीच रशियाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार होता, आता या सवलतींमुळे रशियाचे स्वस्त तेल चीनच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणार आहे.

भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कारण, रशिया आजवर कठीण प्रसंगात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. रशिया भारताला अत्यंत कमी दरात तेल देत असल्याने भारतीय तिजोरीवरील भार हलका होत होता. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे जर भारताने रशियन तेलाकडे पाठ फिरवली, तर रशियाला चीनवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागेल. यामुळे रशिया आणि चीनमधील सामरिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, जे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात डोकेदुखी ठरू शकते.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश जेव्हा भारताच्या प्रतिस्पर्ध्यासोबत (चीन) हातमिळवणी करतो, तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. सध्या चीन रशियाकडून विक्रमी वेगाने क्रूड ऑईलची खरेदी करत आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारत आणि रशियातील पारंपारिक मैत्रीत तणावाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे, अमेरिकेचे हित साधताना भारताला जुन्या मित्राला गमवावे लागणार का? आणि चीनच्या वाढत्या ताकदीला भारत कसे रोखणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: RCF Worker Dies: दीड महिन्यापूर्वीच रुजू झाला अन् दुपारी…, आरसीएफ कंपनीतील कामगाराच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version