रेशन कार्ड हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठीचे कार्ड नसून, ते नागरिकांच्या ओळखीचा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे. केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत हे कार्ड पात्र कुटुंबांना दिले जाते. 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेमुळे आता लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यातील सरकारी रेशन दुकानातून धान्य घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
आर्थिक परिस्थितीनुसार नागरिकांना पिवळे, केसरी आणि पांढरे अशा तीन प्रकारची रेशन कार्डे दिली जातात. यामध्ये अत्यंत गरजू कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड देऊन सर्वाधिक अनुदानाचा लाभ दिला जातो. तर तुलनेने जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. या कार्डधारकांना मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य मिळत नसले, तरी विविध शासकीय कामांसाठी हे कार्ड महत्त्वाचे मानले जाते.
रेशन कार्ड हरवल्यास आता चिंता करण्याचे कारण नाही
पूर्वी रेशन कार्ड हरवले किंवा खराब झाले तर नवीन प्रत मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागत असे. मात्र आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाली असून नागरिक घरबसल्या मोबाईलवरून रेशन कार्डची ई-कॉपी डाउनलोड करू शकतात.
Mera Ration App वरून असा करा डाउनलोड
गुगल प्ले स्टोअरवरून Mera Ration App डाउनलोड करा.
अॅप सुरू करून पसंतीची भाषा निवडा.
आधार क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा.
सुरक्षिततेसाठी MPIN तयार करा.
लॉगिननंतर रेशन कार्डची माहिती स्क्रीनवर दिसेल.
Download पर्यायावर क्लिक करून PDF स्वरूपातील डिजिटल प्रत मोबाईलमध्ये सेव्ह करा.
DigiLocker मधूनही मिळेल डिजिटल प्रत
सर्वप्रथम DigiLocker अॅप डाउनलोड करा.
आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा.
Search पर्यायात 'Ration Card' शोधा.
आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची निवड करा.
रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
'Get Document' वर क्लिक केल्यानंतर रेशन कार्डची डिजिटल प्रत उपलब्ध होईल.
राज्याच्या PDS पोर्टलवरूनही सुविधा
डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत PDS पोर्टलचाही वापर करता येतो.
अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
रेशन कार्डशी संबंधित पर्याय निवडा.
जिल्हा, तालुका, गाव किंवा प्रभागाची माहिती भरा.
रेशन कार्ड क्रमांक किंवा कुटुंबप्रमुखाच्या नावाने शोध घ्या.
रेशन कार्ड दिसल्यानंतर ते PDF स्वरूपात डाउनलोड किंवा प्रिंट करता येईल.
डिजिटल रेशन कार्ड का ठरते उपयुक्त?
डिजिटल रेशन कार्ड मोबाईलमध्ये सुरक्षित राहते. त्यामुळे कार्ड हरवण्याची किंवा खराब होण्याची चिंता राहत नाही. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणे, ओळखपत्र म्हणून वापर करणे आणि आवश्यकतेनुसार तत्काळ प्रत सादर करणे अधिक सोपे होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.