मध्य प्रदेशातील Pench Tiger Reserve येथून राजस्थानमध्ये पहिल्यांदाच एका वाघिणीचे स्थलांतर करण्यात आले आहे. वाघांच्या जनुकीय विविधतेत (Genetic Diversity) वाढ करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, ही प्रक्रिया वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा मानला जात आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजता भारतीय लष्कराच्या MI-17 हेलिकॉप्टरने PN-224 अशी ओळख असलेली तीन वर्षांची वाघीण जयपूर विमानतळावर दाखल झाली.
जयपूरहून वाघिणीला रस्तेमार्गे राजस्थानमधील Ramgarh Vishdhari Tiger Reserve (बुंदी) येथे नेण्यात आले. सुमारे अडीच तासांचा हा हवाई प्रवास होता. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, दोन राज्यांदरम्यान हेलिकॉप्टरद्वारे वाघिणीचे स्थलांतर होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.
रविवारी सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पात वन विभागाच्या पथकाने वाघिणीचा शोध सुरू केला. दाट झाडीत ती विश्रांती घेत असताना आढळून आली. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तिला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. तपासणीत तिचे शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके आणि श्वसनक्रिया पूर्णपणे सामान्य असल्याचे आढळले. सुमारे एक तासांच्या प्रक्रियेनंतर दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी तिला हेलिकॉप्टरने उचलण्यात आले.
सुरक्षेच्या कारणास्तव वाघिणीला थेट बुंदीऐवजी जयपूर येथे आणण्यात आले. त्यानंतर तिला रामगढ अभयारण्यात बजालिया एनक्लोजर (Bajalia Enclosure) मध्ये ठेवण्यात आले आहे. या स्थलांतराची तयारी गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू होती. 25 नोव्हेंबर रोजी वरिष्ठ वन अधिकारी पेंचमध्ये दाखल झाले होते. मूळ आराखड्यानुसार वाघिणीला 10 डिसेंबर रोजी स्थलांतरित करायचे होते, मात्र 6 डिसेंबर रोजी तिचा Radio Collar तुटल्याने ही प्रक्रिया थांबवावी लागली.
सुरुवातीला वाघिणीला थेट पेंचमधून रामगढला नेण्याची योजना होती. रामगढमध्ये हेलिपॅड तयार करण्यात आले होते आणि बुंदीमध्ये दोन दिवस हेलिकॉप्टर ट्रायल्सही घेण्यात आल्या. मात्र भारतीय हवाई दलाने (Air Force) सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्याने संपूर्ण आराखडा बदलावा लागला. त्यामुळे जयपूरमार्गे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या स्थलांतरामागील मुख्य कारण म्हणजे Inbreeding म्हणजेच जवळच्या संबंधातील वाघांमध्ये प्रजनन होण्याचा धोका टाळणे. एखाद्या परिसरात वाघांची संख्या कमी झाली की जनुकीय समस्या वाढतात. यामुळे भविष्यात आजारांचे प्रमाण वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, पिल्लांच्या जन्मात अडचणी आणि शारीरिक कमजोरी यासारखे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे पेंचमधील वाघिणीचे राजस्थानमध्ये स्थलांतर हे वाघांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.