लंडन: जगभरात सायबरसुरक्षेची चर्चा वाढत असतानाही, लोक पासवर्ड निवडताना मात्र सोप्पे आणि कॉमन पासवर्ड्स निवडत आहेत. कॉम्पॅरिटेकच्या नव्या अहवालानुसार वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड अजूनही अतिशय सोपे आणि ओळखायला सहज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यादीत पहिल्यांदा पुन्हा “123456” पासवर्ड आला आहे आणि तो सर्वाधिक वापरला गेलेला पासवर्ड आहे. संस्थेच्या संशोधकांनी 2025 दरम्यान डेटालीक झालेल्या तब्बल 2,000,000,000 पेक्षा जास्त खात्यांचे पासवर्ड संकलित करून तपासले. त्या मिळालेल्या डेटावरून तयार झालेल्या यादीत ‘admin’, ‘password’, ‘12345678’, ‘123456789’ हे पासवर्ड वरच्या स्थानांवर आले.
अहवालानुसार “123456” या पासवर्डचा वापर तब्बल 7,600,000 वेळा झाला आहे, ज्यामुळे त्याची धोकादायक लोकप्रियता स्पष्ट होते. याच यादीत “India@123” हा पासवर्ड 53 व्या क्रमांकावर असून, म्हणजेच भारतातील वापरकर्तेही सोपे आणि अंदाज लावता येणारे शब्द व अंक एकत्र करून पासवर्ड म्हणून वापरत आहेत. गेम संदर्भातील ‘minecraft’ हा पासवर्ड 70,000 वेळा आणि त्याचा मोठ्या अक्षरांचा प्रकार 20,000 वेळा आढळला, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. अहवालात आणखी काही आकडे सामने आले आहेत.
टॉप 1000 पासवर्डपैकी 25% पासवर्ड फक्त आकड्यांनी बनलेले आहेत, 38.6% पासवर्डमध्ये ‘123’ हा क्रम आढळतो आणि 2% मध्ये ‘321’ अशी उलट शृंखला आहे. तसेच 3.1% पासवर्डमध्ये ‘abc’ हा क्रम दिसतो. ‘password’, ‘admin’, ‘qwerty’ हे सामान्य शब्द अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत.
सायबरसुरक्षा तज्ज्ञांचे लक्ष वेधणारे मत म्हणजे लहान आणि सोपे पासवर्ड हॅकर्ससाठी सहज हॅक करता येण्यासारखे असतात. आधुनिक brute-force सॉफ्टवेअर आणि तंत्रे अशा पासवर्ड्सना काही सेकंदांत फोडू शकतात. त्यामुळे किमान 12 किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरांचा, मोठी आणि लहान अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हे यांचा समावेश असलेला पासवर्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय दुहेरी प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) सक्षम ठेवण्याचा सायबर तज्ञ आग्रह करत आहेत.
पासवर्ड लीक झाला तरी दुसरा सुरक्षा स्तर तुमचं खातं वाचवू शकतो. कॉम्पॅरिटेकच्या अभ्यासाचा निष्कर्ष साधा आणि स्पष्ट आहे. तंत्रज्ञान जास्त प्रगत झाले तरीही माणसांची सोपी सवय हॅकर्सला संधी देते. वास्तविकपणे पाहता सायबर सुरक्षितता म्हणजे जागरूकता, सतर्कता आणि मजबूत पासवर्ड्सचा वापर.
हेही वाचा: RBI Junio Payments: आता बँक खात्याशिवाय चालणार UPI! लहान मुलंही करू शकणार ऑनलाइन पेमेंट
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.