राज्यातील शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी पायी निघाले आहेत. गुरुवारी शेतकऱ्यांच्या लाँगमार्चचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, गुरुवारी राज्याचे महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला भेट देणार आहेत.
नैसर्गिक आपत्ती आणि राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी किसान सभेच्या पुढाकाराने २६, २७, २८ एप्रिल २०२३ रोजी अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात आला. गुरुवारी लाँगमार्चला दुसरा दिवस असून आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेट देणार आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात विखे-पाटील सविस्तर चर्चा करणार आहेत. विखे-पाटील यांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांची पुढची भूमिका ठरणार असून समाधान न झाल्यास शेतकऱ्यांचा लाँगमार्च पुन्हा महसूल मंत्र्यांच्या घराकडे निघेल.
या मोर्चामध्ये किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारो शेतकऱ्यांसह पायी चालत आहेत. दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचे धोरण सरकार आखत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विविध मागण्यांसह दुग्धजन्य पदार्थाच्या सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चामध्ये आवाज उठवला जात आहे. तसेच कापूस, सोयाबीनचे पडलेले भाव यासह इतर प्रश्न अशा १८ मागण्यांचा समावेश या मोर्चात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणीची किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.