कराची: मध्यपूर्वेतील वाळवंट पुन्हा एकदा युद्धाच्या धगीने तापले असून, यावेळी उडालेली ठिणगी संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटण्याची चिन्हे आहेत. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा केल्याने जागतिक राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. गेल्या 24 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या भीषण हल्ल्यांनी केवळ इराणलाच नव्हे, तर संपूर्ण आखाती देशांना हादरवून सोडले आहे. राजनैतिक संकेतांना तिलांजली देत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता जगावर युद्धाचे काळे ढग दाटून आले आहेत.
संघर्षाची ही धग कमी होण्याऐवजी अधिकच भडकत चालली आहे. खामेनेई यांच्या निधनानंतर आता मोजतबा खामेनी यांच्याकडे इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र, अमेरिकेने यावर अधिक आक्रमक पवित्रा घेत इराणला थेट आणि गंभीर इशारा दिला आहे.
“इराण ज्याचा स्वप्नातही विचार करू शकणार नाही, असा सर्वात मोठा हल्ला आजच करू,” अशी उघड धमकी अमेरिकेने दिल्याने परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. इराणला प्रतिहल्ला करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने हा अत्यंत आक्रमक मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
या महायुद्धाचे पडसाद आता केवळ मर्यादित राहिलेले नाहीत. युद्धाच्या भीतीने दुबई आणि कतारसह अनेक देशांमधील विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, रोजगार आणि व्यवसायानिमित्त या देशांमध्ये गेलेले हजारो भारतीय नागरिक तेथेच अडकून पडले आहेत. एकीकडे आकाशातून बॉम्बचा वर्षाव होण्याची भीती आणि दुसरीकडे मायदेशी परतण्याचे मार्ग बंद, अशा दुहेरी कोंडीत हे निष्पाप नागरिक सापडले आहेत.
खामेनेई हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर शिया समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरू असल्याने या हत्येचे तीव्र पडसाद जगभरातील मुस्लिम राष्ट्रांमध्ये उमटत आहेत. विशेषतः पाकिस्तानात या संतापाचा अक्षरशः स्फोट झाला आहे. कराचीमध्ये हजारो संतप्त आंदोलकांनी थेट अमेरिकन वाणिज्य दूतावासाला लक्ष्य करत इमारतीची मोठ्या प्रमाणावर काचफोड आणि जाळपोळ केली. अब्बास टाऊनमधून निघालेला शिया संघटनांचा हा मोर्चा एम. टी. खान रोडवरील दूतावासावर धडकला आणि संपूर्ण परिसराला युद्धाच्या मैदानाचे स्वरूप आले. दंगेखोरांनी काठ्या आणि दांडक्यांच्या साहाय्याने अक्षरशः हैदोस घातला.
Locals protesting Iran strikes are currently smashing windows at a U.S. consulate in Karachi, Pakistan. pic.twitter.com/hlOd8cipgb — Open Source Intel (@Osint613) March 1, 2026
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कराची पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला आणि अखेर गोळीबार केला. स्थानिक ‘एधी रेस्क्यू सर्व्हिस’ने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक झटापटीत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल रुग्णालयात दाखल आहेत.
आंदोलकांनी सुलतानाबाद येथील वाहतूक पोलिसांच्या चौकीलाही आग लावली असून, अमेरिकन दूतावासामध्ये काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. नुमाईश चौकाकडे जाणारे मार्ग बंद करून सुरक्षेसाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असला तरी, कराचीतील स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे.
इस्रायलमधील नागरिकांना अगोदरच सतर्कतेचा इशारा देणाऱ्या अमेरिकेला आता पाकिस्तानातील या थेट हल्ल्याला कसे सामोरे जावे लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एका बाजूला इराणवर नवा हल्ला करण्याची अमेरिकेची तयारी आणि दुसरीकडे जगभरातून उसळलेला संतापाचा लाव्हारस, यामुळे जागतिक शांतता सध्या बारूदच्या ढिगाऱ्यावर बसली आहे. हा वणवा वेळीच न विझल्यास त्याची झळ संपूर्ण जगाला बसल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.