इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असून, दक्षिण लेबनानमधील बिंत जबील शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी लढाई सुरू आहे. इस्रायली संरक्षण दलाने दावा केला आहे की त्यांनी बिंत जबील शहराला पूर्णपणे घेरले असून, पुढील काही दिवसांत या भागावर संपूर्ण ताबा मिळवला जाईल. इस्रायलच्या मते, गेल्या आठवडाभरात 98व्या डिव्हिजनच्या सैनिकांनी शहराला वेढा घालत आता थेट जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे.
इस्रायलने या कारवाईत 100 हून अधिक हिजबुल्लाह लढवय्ये ठार झाल्याचा दावा केला आहे. लष्कराने शहरातील अनेक बोगदे, शस्त्रसाठे, रॉकेट प्रक्षेपण केंद्रे आणि हिजबुल्लाहच्या तळांवर हवाई हल्ले केल्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी रुग्णालयांच्या परिसरातूनही शस्त्रे सापडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. याशिवाय, शहरातील काही घरे पाडण्यास सुरुवात झाल्याचेही वृत्त आहे.
बिंत जबील हे हिजबुल्लाहचे मजबूत केंद्र मानले जाते. 2006 मधील युद्धातही हे शहर संघर्षाचे प्रमुख केंद्र होते. हिजबुल्लाहचे माजी प्रमुख हसन नसीरुल्लाह यांनी याच शहरातून प्रसिद्ध भाषण केले होते. त्यामुळे या शहराला प्रतीकात्मक आणि सामरिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. अलीकडेच इजरायली सैन्याने शहरातील स्टेडियमवर ताबा मिळवल्याचाही दावा केला आहे.
दुसरीकडे, हिजबुल्लाहने इस्रायलचे दावे फेटाळले आहेत. संघटनेचे म्हणणे आहे की शहरात अद्याप “रक्तरंजित लढाई” सुरू असून, त्यांचे लढवय्ये इजरायली सैनिकांना मोठे नुकसान पोहोचवत आहेत. काही अहवालांनुसार, हिजबुल्लाहने ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांद्वारे इजरायली तळांवर प्रत्युत्तर दिले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अद्याप दोन्ही बाजूंमध्ये तीव्र संघर्ष सुरू असल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे.
हा संघर्ष अशा वेळी वाढला आहे, जेव्हा अमेरिकेमध्ये इस्रायल आणि लेबनान यांच्यात अनेक दशकांनंतर थेट चर्चा सुरू झाली आहे. मात्र हिजबुल्लाहने या चर्चांना विरोध दर्शवला असून, शस्त्रसंधीशिवाय कोणतीही चर्चा मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या युद्धामुळे लेबनानमध्ये हजारो नागरिकांचे जीव गेले असून, 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. दक्षिण लेबनानमध्ये मानवी संकट अधिक गंभीर बनत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.