मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातून बुधवारी (18 मार्च 2026) रोजी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना समोर आली. शहरातील एका घरात लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जणांना बचाव पथकाने जीवंत बाहेर काढले आहे. प्राथमिक तपासानुसार, इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉइंटवर झालेल्या स्फोटानंतर ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही क्षणांतच आग संपूर्ण घरात पसरली आणि संपूर्ण घर जळून खाक झाले.
इंदूरचे पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराबाहेर एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला लावलेले होते. चार्जिंग पॉइंटवर अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर लागलेली आग वाहनातून घराच्या आतील भागात पसरली. या घरात 10 पेक्षा अधिक गॅस सिलेंडर साठवून ठेवलेले होते. आगीमुळे त्यांपैकी काही सिलेंडरचा स्फोट झाला आणि परिस्थिती अधिक भीषण बनली. हे घर मनोज पुगलिया यांचे असून ते पॉलिमर व्यवसायाशी संबंधित असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. घरात काही ज्वलनशील रसायनांचाही साठा असल्याने आगीची तीव्रता वाढली.
ही दुर्घटना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. बाहेर चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक वाहनातून लागलेली आग घरापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण इमारत धगधगू लागली.
#WATCH | Indore, Madhya Pradesh | Commissioner of Police for Indore, Santosh Kumar Singh says, "…As per initial investigations, an electrical vehicle was being charged outside the house and the charging point exploded…The fire then spread to the house from the car…More than… https://t.co/3eyJQ5ydPG pic.twitter.com/BGWZreycQr — ANI (@ANI) March 18, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात इलेक्ट्रॉनिक लॉकची व्यवस्था होती. आगीदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक लॉक उघडता आले नसावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घरातील काही लोक बेडरूम किंवा इतर खोल्यांमध्ये अडकून पडले असावेत. परिणामी त्यांना वेळेत बाहेर पडता आले नाही आणि ही दुर्घटना अधिक गंभीर ठरली.
बचावकार्य सुरू असतानाही पोलिस आणि अग्निशमन दलासमोर दोन ते तीन मोठे स्फोट झाले. घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर साठवलेले असल्याने आगीची तीव्रता वाढतच गेली. सकाळी चार ते साडेचार दरम्यान हे स्फोट झाले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेजारील घरांच्या टेरेसवरून आत प्रवेश करून बचावकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अग्निशमन दलाने प्रचंड धूर आणि आगीच्या ज्वाळांमध्येही धाडसाने बचावकार्य सुरू ठेवले. सुरुवातीला तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र नंतर बाहेर काढलेल्या सहा जणांचा जीव वाचवता आला नाही. काही जण घरातील वेगवेगळ्या भागांत अडकून पडल्याचे दिसून आले. भिंती आणि दरवाजे तोडून त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. या भीषण आगीने परिसरात शोककळा पसरली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.