नवी दिल्ली: 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारताने आज जगाला आपल्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची प्रचिती दिली आहे. कर्तव्य पथावर झालेल्या दिमाखदार संचलनादरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (Defence Research and Development Organisation, DRDO) विकसित केलेले 'लॉन्ग रेंज अँटी-शिप हायपरसोनिक मिसाइल' (Long Range Anti-Ship Hypersonic Missile, LRAShM) पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आले. हे क्षेपणास्त्र केवळ एक शस्त्र नसून, हिंदी महासागर क्षेत्रात भारताचे वर्चस्व अधोरेखित करणारे 'आधुनिक युगातील ब्रह्मास्त्र' मानले जात आहे.
या क्षेपणास्त्राची तांत्रिक वैशिष्ट्ये थक्क करणारी आहेत. जवळपास 1500 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता असलेल्या या मिसाइलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा आठ ते 10 पट जास्त आहे. म्हणजेच, एकदा डागल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांच्या आत हे क्षेपणास्त्र शत्रूच्या युद्धनौकांचा अचूक वेध घेऊ शकते. या प्रचंड हायपरसोनिक वेगामुळे शत्रूच्या रडारला याचा थांगपत्ता लागणे जवळपास अशक्य आहे, ज्यामुळे भारताची समुद्री हल्ला करण्याची आणि शत्रूचा प्रतिकार करण्याची क्षमता आता कैक पटीने वाढली आहे.
हे क्षेपणास्त्र 'हायपरसोनिक ग्लाइड व्हीकल' तंत्रज्ञानावर आधारित आहे. पारंपारिक बॅलिस्टिक मिसाइलच्या तुलनेत याचा मार्ग अत्यंत अनियमित असतो. हे क्षेपणास्त्र रॉकेटच्या सहाय्याने अवकाशाच्या उंबरठ्यापर्यंत नेले जाते, त्यानंतर ते पुन्हा वातावरणात प्रवेश करते आणि वाकड्या-तिकड्या मार्गाने 'ग्लाइड' करत लक्ष्याकडे झेपावते. या अनपेक्षित हालचालींमुळे जगातील कोणत्याही प्रगत क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेला (Missile Defence System) याला हवेतच रोखणे अत्यंत कठीण जाणार आहे.
भारताच्या या यशाने जागतिक संरक्षण इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. हायपरसोनिक तंत्रज्ञानामध्ये आतापर्यंत केवळ रशिया, चीन आणि अमेरिका यांसारख्या मोजक्या देशांचा दबदबा होता. मात्र, आता भारताने या एलिट क्लब'मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय नौदलासाठी हे पाऊल विशेषतः महत्त्वाचे आहे, कारण यामुळे विमानवाहू युद्धनौका आणि मोठ्या विनाशिकांवर (Destroyers) दुरूनच अचूक हल्ला करणे शक्य होईल.
हैदराबाद येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाइल कॉम्प्लेक्समध्ये या अद्भूत तंत्रज्ञानावर रात्रंदिवस काम सुरू आहे. DRDO च्या शास्त्रज्ञांच्या मते, ही केवळ एक सुरुवात आहे. भविष्यात या मिसाइलची रेंज 3000 ते 3500 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, जमिनीवरून हल्ला करणारी आवृत्ती देखील विकसित केली जाणार असून, यामुळे भारतीय सैन्यदलाची शक्ती तिप्पट होणार आहे.
थोडक्यात सांगायचे तर, 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला या यशामुळे नवे बळ मिळाले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात, विशेषतः शत्रूच्या युद्धनौकांच्या वाढत्या हालचालींना लगाम घालण्यासाठी हे क्षेपणास्त्र एक 'गेम चेंजर' ठरेल. भारताच्या या 'हायपरसोनिक' यशामुळे शत्रूच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, जागतिक स्तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.