पाटीदार समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल यांची सध्या गुजरातच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. गुजरातमधील पाटीदार आंदोलनात सामील होण्यापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापासून प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंत आणि काँग्रेसला रामराम केल्यानंतर आता पुढे ते काय भूमिका घेणार? इथपर्यंत ते सतत चर्चेत आहेत. हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केल्यापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून हार्दिक पटेल यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशहित आणि राज्याच्या हिताची कामे करण्याबरोबरच आपल्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘छोटा शिपाई’ आहे, असे ते म्हणाले. हार्दिक पटेल यांच्यासह पाटीदार आंदोलनातील त्यांचे सहकारी आणि अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हार्दिक पटेल यांनी मागील महिन्यात काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हार्दिक जवळपास तीन वर्षे काँग्रेसमध्ये होते. पक्षात दुर्लक्षित केल्याचा आरोप करत, युवकांना संधी दिली जात नसल्याचे हार्दिक म्हणाले होते. १८ मे रोजी हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केला होता. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर हार्दिक पटेल म्हणाले मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असे ट्विट पटेल यांनी केले होते .
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.