Gold Silver Rate: सोनं स्वस्त झालं! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम की जागतिक तणाव? सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा आजचे दर

सोन्याचे दर घसरत असताना चांदीच्या किमतीत मात्र किरकोळ वाढ दिसून आली आहे.
Gold Silver Rate: सोनं स्वस्त झालं! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम की जागतिक तणाव? सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा आजचे दर

नवी दिल्ली: जागतिक राजकारणातील वाढता तणाव आणि देशांतर्गत घडामोडींमुळे सध्या सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने आज (11 मे 2026) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या 'सोने खरेदी टाळा' या आवाहनाचा प्रभावही बाजारपेठेवर जाणवू लागला असून, मागणीत घट झाल्याने दर खाली आले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील स्थिती

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याच्या वायदा भावात आज 580 रुपयांची म्हणजेच 0.38 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. यामुळे सोन्याचा भाव 1,51,944 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील सत्रात हाच भाव 1,52,530 रुपयांवर बंद झाला होता. पश्चिम आशियातील तणाव आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी (Profit Booking) केलेल्या विक्रीमुळे स्थानिक सराफा बाजारातही सोन्याची झळाळी काहीशी कमी झालेली पाहायला मिळाली.

दिल्लीतील सराफा बाजाराचे ताजे दर

अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या (24 कॅरेट) सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरून 1,55,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. गुरुवारी (7 मे 2026) हा दर 1,56,000 रुपये होता. तसेच 99.5 टक्के शुद्धतेचे सोनेही 100 रुपयांनी स्वस्त होऊन 1,55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. जागतिक बाजारात जरी स्पॉट गोल्डचे दर वाढलेले दिसत असले, तरी भारतीय बाजारात मात्र सध्या मंदीचे वातावरण आहे.

हेही वाचा: Shooters Arrested: गँगस्टर हाशिम बाबा टोळीला मोठा दणका! क्राईम ब्रांचने 'या' 6 खतरनाक शूटर्सना ठोकल्या बेड्या

चांदीच्या दरात मात्र तेजीचा कल

सोन्याचे दर घसरत असताना चांदीच्या किमतीत मात्र किरकोळ वाढ दिसून आली आहे. 3 जुलै 2026 रोजी संपणाऱ्या चांदीच्या वायदा दरात 400 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या चांदीचा दर 2,62,200 रुपये प्रति किलोग्रामच्या पातळीवर व्यवहार करत आहे. औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे चांदीने आपली वाढ कायम राखली आहे.

मोदींच्या आवाहनाचा 'इम्पॅक्ट'?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना परकीय चलन वाचवण्यासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर बाजारपेठेत सोन्याची मागणी घटल्याचे चित्र आहे. मध्यमवर्गीय आणि मोठे गुंतवणूकदार सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यातच जागतिक स्तरावर इंधन दरवाढ आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत असून, भविष्यात हे दर कुठे स्थिर होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला

सोने बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्यात मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. अमेरिका आणि इराणमधील वाद अधिक चिघळल्यास सोन्याचे दर पुन्हा वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्याची घसरण ही अल्पकालीन नफा वसुलीचा भाग असू शकते. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी जागतिक घडामोडींचा आढावा घेणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल.

हेही वाचा: Rahul Gandhi : 'हे उपदेश नव्हे तर अपयशाचे पुरावे'; पंतप्रधान मोदींच्या त्या सात आवाहनांवर राहुल गांधींचा हल्लाबोल

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version