राज्याच्या विकासाचा महामार्ग असा गाजावाजा करत मागील महिन्यात सुरू करण्यात आलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा अपघातांचा मार्ग ठरत आहे. लोकार्पण झाल्यापासून या महामार्गावर ३५ हून अधिक अपघात झाले असून बुधवारी रात्री त्यात आणखी एका अपघाताची भर पडली. बुधवारी मध्यरात्री शेवगाव राऊत परिसरात ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला. अपघातग्रस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४० ए. के. ५१०८ क्रमांकाचा एक ट्रक औरंगाबादवरून नागपूरकडे निघाला होता. ट्रकचा चालक अखिलेश कुमार पांडे याला अचानक डुलकी लागली आणि त्याचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं. पुन्हा सावरण्याच्या आतच हा ट्रक रस्त्यालगतच्या सिमेंट भिंतीवर जाऊन आदळला. यात ट्रकचा टायर फुटला आणि अपघातग्रस्त ट्रक इमर्जन्सी लेनवर जाऊन उलटला. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनं या ट्रकला धडक दिली. यात पहिल्या ट्रकचे चालक ज्ञानेश्वर काटकडे यांचा जागीच मृत्यू झाला. काटकडे हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हदगावचे रहिवासी होते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना आवश्यक मदत केल्यानंतर क्रेनच्या मदतीनं ट्रक बाजूला करण्यात आला आणि ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातून जात असलेला समृद्धी मार्ग नुकताच तिथल्या ३०० मजुरांना मागील पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्याने चर्चेत आला होता. त्याआधी ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन झालं. मात्र या महामार्गावर अपघाताची जणू मालिकाच सुरू आहे. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी आता वेगमर्यादेचं काटेकोर पालन केलं जाण्याची गरज अधोरेखित होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.