Facebook Policy Update: सोशल मीडियावर कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी एक मोठा बदल समोर आला आहे. फेसबुकने आपल्या धोरणांमध्ये काही महत्त्वाचे बदल करत ‘कॉपी-पेस्ट’ करणाऱ्या पेजेसवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नव्या नियमांनुसार, जर एखाद्या पेजवर वारंवार दुसऱ्यांचा मजकूर किंवा व्हिडिओ कॉपी करून टाकला जात असेल, तर त्या पेजची रीच मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ती थेट शून्यावरही जाऊ शकते.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा माध्यम राहिलेला नाही. अनेकजण फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ, लेख आणि माहितीपूर्ण पोस्ट तयार करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. याचबरोबर अनेक पेजेस दुसऱ्यांचा कंटेंट जसाच्या तसा कॉपी करून पोस्ट करत असल्याच्या तक्रारीही वाढत होत्या. त्यामुळे मूळ कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्सना योग्य श्रेय मिळत नव्हते. या पार्श्वभूमीवर फेसबुकने ओरिजनल कंटेंटला अधिक प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या पॉलिसीनुसार, फक्त एखाद्या व्हिडिओवर आपला लोगो लावणे, त्याची गती बदलणे किंवा छोटासा एडिट करणे याला आता ‘नवीन’ कंटेंट मानले जाणार नाही. कंटेंटमध्ये स्वतःची कल्पकता आणि वेगळेपणा असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देणे, त्याचे विश्लेषण करणे किंवा त्यात नवीन माहिती जोडणे अशा प्रकारे जर क्रिएटर स्वतःचे योगदान देत असेल तरच त्या कंटेंटला महत्त्व दिले जाईल.
या बदलांसोबतच फेसबुकने क्रिएटर्ससाठी असलेले डॅशबोर्डही अधिक सक्षम केले आहेत. या प्रणालीमुळे एखादा व्हिडिओ किंवा मजकूर सर्वात आधी कुठे अपलोड झाला होता हे सहजपणे ओळखता येते. जर कोणी तोच कंटेंट कॉपी करून दुसऱ्या पेजवर टाकला, तर त्या पेजवर ‘ओरिजनल कंटेंट मर्यादित’ असा इशारा दिसू शकतो.
अशा इशाऱ्यांची संख्या वाढल्यास फेसबुक त्या पेजवरील पोस्टची रीच कमी करू शकते. म्हणजेच त्या पेजवरील पोस्ट लोकांच्या न्यूजफीडमध्ये कमी दिसतील किंवा काही वेळा पूर्णपणे दिसणारही नाहीत. त्यामुळे केवळ कॉपी-पेस्ट करून चालणाऱ्या पेजेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मात्र या निर्णयाचा फायदा मूळ कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्सना होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील किंवा छोट्या शहरांमधील क्रिएटर्स जे स्वतःचे व्हिडिओ, माहितीपूर्ण पोस्ट किंवा लेख तयार करतात, त्यांना आता अधिक संधी मिळू शकते. त्यांच्या मेहनतीचे श्रेय त्यांनाच मिळेल आणि त्यांच्या कंटेंटला अधिक प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, या बदलांमुळे फेसबुकवर दर्जेदार आणि माहितीपूर्ण कंटेंट वाढण्यास मदत होईल. ज्ञानावर आधारित पेजेस, अभ्यासपूर्ण माहिती देणारे क्रिएटर्स आणि संशोधनावर आधारित पोस्ट तयार करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरू शकते.
एकूणच, सोशल मीडियावर आता केवळ फॉलोअर्स किंवा व्ह्यूज यापेक्षा ओरिजनल आणि दर्जेदार कंटेंटला अधिक महत्त्व मिळणार असल्याचे या नव्या धोरणातून स्पष्ट होत आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.