पुणे : मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत तीन मजली इमारत कोसळून तीन कामगाराचा जीव गेला असून आठ कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकून आहेत. गेल्या 65 तासांपासून येथे शोधकार्य सुरू आहे. त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला असून महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला समोर आला आहे.
27 जुलै 2023 ला या अॅडमिन बिल्डींगला रेकॉर्ड प्लॅननुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला. मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचाचं उल्लेख आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का? असा प्रश्न बांधकाम विभागाकडे विचारला असता, पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले आहे. त्यामुळे वरच्या दोन मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे यातून स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या पर्यावरण विभागाने 26 जुलैला सुधारित बांधकामासाठी परवानगी मागितली. त्यासाठी चोवीस तासांतच म्हणजे 27 जुलैला पूर्णत्वाचा दाखला देण्याची तत्परता पालिकेच्या बांधकाम विभागाने दाखवली. म्हणजे तीन मजली इमारतीची पाहणी न करताच, बांधकाम विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिला का?, असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.